
माणदेश एक्सप्रेस न्यूज | लुधियाना :
प्रेम, लग्न आणि सोबत मिळवण्याच्या स्वप्नांनी अमेरिकेतून भारतात आलेल्या एका ज्येष्ठ महिलेला आयुष्य गमवावे लागले. 71 वर्षीय रुपिंदर कौर या अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय वंशाच्या महिलेला पंजाबमध्ये निर्दयीपणे मारण्यात आले. महिन्यांनंतर तिचा जळालेला मृतदेह आणि त्यामागचा कट उघड झाल्यानंतर पोलिसांनाही धक्का बसला आहे.
वयाच्या 71 व्या वर्षी रुपिंदर कौर यांना आयुष्याच्या उत्तरार्धात जोडीदाराची साथ हवी होती. इंग्लंडमध्ये राहणाऱ्या 75 वर्षीय चरणजित सिंग या व्यक्तीसोबत त्यांचे संबंध प्रस्थापित झाले. दोघांनी लग्न करण्याचे मान्य केले होते. या निमित्ताने रुपिंदर कौर भारतात आल्या होत्या. पण, काही दिवसांतच त्यांचा पत्ता गायब झाला.
24 जुलैनंतर त्यांचा मोबाईल सतत बंद लागल्याने अमेरिकेत राहणाऱ्या त्यांच्या बहिणीने संशय व्यक्त केला. अमेरिकन दूतावासामार्फत पंजाब पोलिसांना कळवण्यात आले. सुरुवातीला रुपिंदरच्या बेपत्त्याची तक्रार दाखल झाली; पण तपास जसजसा पुढे सरकत गेला, तसतसे धक्कादायक सत्य बाहेर आले.
पोलिस तपासात उघड झाल्यानुसार, चरणजित सिंग लग्नाचा विचार बदलून रुपिंदरपासून दूर जाण्याचा प्रयत्न करत होते. मात्र रुपिंदर लग्नावर ठाम होत्या. त्यांनी पोलिसात तक्रार करण्याची धमकी दिल्यानंतर चरणजितनेच तिच्या हत्येचा कट रचला.
यासाठी त्याने लुधियाना जिल्हा न्यायालयात टायपिस्ट म्हणून काम करणाऱ्या सुखजित सिंग उर्फ सोनू याला 50 लाख रुपये आणि युकेमध्ये नेण्याचे आमिष दाखवले. सोनूने लोभाला बळी पडत रुपिंदरची हत्या केली.
लुधियान्यातील किला रायपूर गावात सोनूने बेसबॉल बॅटने रुपिंदरवर हल्ला करून हत्या केली. गुन्हा लपवण्यासाठी त्याने घरात मोठ्या प्रमाणावर कोळसा मागवून आग लावली. मृतदेह जळून फक्त राख आणि हाडे उरल्यावर ती पोत्यात भरून नाल्यात टाकून दिली.
सदर घरात काळपट राख, धुराच्या खुणा, नव्याने लावलेले रंग-टाइल्स पाहून गावकऱ्यांना शंका आली आणि अखेर पोलिसांच्या तपासातून संपूर्ण कट उघड झाला. चौकशीत सुखजितने स्वतः गुन्ह्याची कबुली दिली.
लुधियान्यातील अतिरिक्त पोलिस उपायुक्त करणवीर सिंह यांनी सांगितले की, रुपिंदर कौर आणि चरणजित सिंग यांची अनेकदा भेट झाली होती, त्यांचे फोटोही पोलिसांकडे आहेत. सध्या सुखजित पोलिस कोठडीत असून, खूनाचा मुख्य सूत्रधार चरणजित सिंग युकेमध्ये आहे. त्याला भारतात आणण्यासाठी पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
या संपूर्ण घटनेने पंजाबसह परदेशातील भारतीय समुदायातही खळबळ उडाली आहे. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात सहचार शोधणाऱ्या एका महिलेचा शेवट असा भयानक झाला, हे धक्कादायक वास्तव ठरले आहे.