
Viral Police Video : सोशल मीडियावर सध्या एक हृदयस्पर्शी व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली असताना एका महिला पोलिस कर्मचाऱ्याने रुग्णवाहिकेला वाट करून देत दाखवलेली कर्तव्यदक्षता आणि माणुसकी नेटिझन्सच्या मनाला भिडत आहे.
घटनेचा व्हिडिओ पाहता येतो की, रुग्णाला घेऊन धावणारी रुग्णवाहिका ट्रॅफिकमध्ये अडकली होती. वाहनांची लांबलचक रांग लागलेली असताना एक महिला पोलिस कर्मचारी तत्काळ पुढे आली. तिने वाहनांच्या मधून धावत-धावत चालकांना बाजूला व्हायला सांगत रुग्णवाहिकेला मार्ग करून दिला. काही क्षणांतच रुग्णवाहिका ट्रॅफिकमधून बाहेर पडली आणि पुढे निघाली.
सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर करताना लिहिले आहे, “समाजाला अशाच कर्तव्यदक्ष पोलिसांची गरज आहे.” या व्हिडिओवर हजारो लोकांनी प्रतिक्रिया देत महिला पोलिसांचे कौतुक केले आहे. एकाने लिहिले, “सलाम अशा इमानदार पोलिसांना,” तर दुसऱ्याने म्हटले, “एक नंबर ताई, तुमच्या कामाला आमचा सलाम,” तर तिसऱ्याने भावनिक होत लिहिले, “सेवेपलीकडील कर्तव्य.”
रुग्णवाहिका म्हणजे प्रत्येक रुग्णासाठी आशेचा किरण असते. मात्र वाहतूक कोंडीमध्ये अडकून रुग्णाची जीविताशी शर्यत सुरू असते. अशा वेळी वेळेवर वाट करून देणे म्हणजे केवळ नियम पाळणे नसून ती खरी माणुसकी असते—आणि याचाच प्रत्यय या महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या कृतीतून आला आहे.