
माणदेश एक्सप्रेस न्यूज | मुंबई
राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी महायुती सरकारकडून सातत्याने नवनवीन योजना राबवल्या जात आहेत. नुकतीच ‘लाडकी बहीण’ योजना जाहीर केल्यानंतर आता महिला व नोकरदार वर्गातील मातांना दिलासा देणारी आणखी एक महत्त्वाची योजना सरकारने जाहीर केली आहे. केंद्र शासनाच्या मिशन शक्ती अंतर्गत ‘सामर्थ्य’ उपक्रम राबविताना महिलांना नोकरीदरम्यान मुलांची योग्य ती काळजी घेता यावी, यासाठी ‘पाळणा योजना’ सुरू करण्यात आली आहे.
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ महिने ते ६ वर्षे वयोगटातील मुलांसाठी ही योजना लाभदायक ठरणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात राज्यातील ३४५ ठिकाणी पाळणाघरे सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
पाळणाघरातील सुविधा
या पाळणाघरांमध्ये महिलांच्या मुलांसाठी सुरक्षित व दर्जेदार सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामध्ये –
डे-केअर सुविधा
पूर्व शालेय शिक्षण
पूरक पोषण आहार
वाढीचे नियमित निरीक्षण
आरोग्य तपासणी व लसीकरण
तसेच मुलांना दिवसातून तीन वेळा आहार पुरविला जाईल. सकाळचा नाश्ता, दुपारचे गरम जेवण आणि संध्याकाळचा नाश्ता असा या योजनेचा आराखडा आहे.
पाळणाघरे महिन्यात २६ दिवस, रोज ७.५ तास सुरू राहणार असून, प्रत्येक पाळणाघरात जास्तीत जास्त २५ मुले ठेवली जातील. यासाठी एक पाळणा सेविका आणि एक पाळणा मदतनीस नेमण्यात येणार आहेत. तसेच वीज, पिण्याचे पाणी, बालस्नेही शौचालय यांसारख्या सुविधा देण्यात येतील.
मानधन व भत्ते
या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांसाठी मानधन आणि भत्त्यांची तरतूद करण्यात आली आहे –
अंगणवाडी सेविका : ₹१५०० प्रतिमाह भत्ता
अंगणवाडी मदतनीस : ₹७५० प्रतिमाह भत्ता
पाळणा सेविका : ₹५५०० प्रतिमाह मानधन
पाळणा मदतनीस : ₹३००० प्रतिमाह मानधन
लाडकी बहीण योजनेला ही जोड
दरम्यान, नुकत्याच एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लाडकी बहीण योजना’ पुढील पाच वर्षे सुरू राहील, तसेच सध्या मिळणारे ₹१५०० मानधन योग्यवेळी वाढविले जाईल, असे आश्वासन दिले होते. राज्यातील बचत गटांद्वारे २५ लाख ‘लखपती दीदी’ तयार झाल्या आहेत. यंदा आणखी २५ लाख महिलांना या योजनेतून फायदा होणार असून, पुढील काही वर्षांत ही संख्या एक कोटींपर्यंत पोहोचेल, असा दावा त्यांनी केला.
महिलांसाठी केजी ते पीजी शिक्षण मोफत करण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे. बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी यासाठी पहिल्या टप्प्यात १० मॉल उभारले जाणार आहेत.
महिलांसाठी दुहेरी दिलासा
‘लाडकी बहीण’ योजनेनंतर जाहीर झालेली ‘पाळणा योजना’ ही नोकरदार व कामगार महिलांसाठी मोठा दिलासा ठरत आहे. एका बाजूला महिलांना थेट आर्थिक मदत, तर दुसऱ्या बाजूला मुलांच्या संगोपनाची सुरक्षित सोय अशा दुहेरी सुविधेमुळे महिला वर्गात समाधानाचे वातावरण आहे.