
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी / प्रतिनिधी : आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, विकासकामांच्या टेंडर प्रक्रियेत गंभीर गैरप्रकार झाल्याचा आरोप संचालक दादासाहेब हुबाले यांनी केला आहे. पारदर्शक कारभाराचा दावा करणाऱ्या बाजार समितीने प्रत्यक्षात चुकीच्या पद्धतीने टेंडर रद्द करून आपल्या निकटवर्तीयांना लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
हुबाले यांनी दिलेल्या निवेदनानुसार, बाजार समितीने पेव्हिंग ब्लॉक, गटर, वजन काटा आणि पॅक हाऊस यांसारख्या सुमारे दीड कोटी रुपयांच्या विकासकामांसाठी ई-निविदा प्रक्रिया राबवली होती. ३१ मार्च रोजी झालेल्या मासिक सभेमध्ये या टेंडर मंजुरीचा विषय चर्चेसाठी ठेवण्यात आला होता. मात्र, पुढे अचानक ही टेंडर प्रक्रिया रद्द करण्यात आली असून, त्यामागे संशयास्पद कारणे असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
विशेष म्हणजे, टेंडर रद्द करताना २ एप्रिल २०२६ रोजी मासिक सभा झाल्याचे दाखवण्यात आले आहे. प्रत्यक्षात त्या दिवशी कोणतीही मासिक सभा पार पडलेली नसताना खोटी नोंद करून टेंडर रद्द करण्यात आले, असा आरोप हुबाले यांनी केला आहे. या प्रकारामुळे शासन, पणन विभाग आणि सर्वसामान्य नागरिकांची दिशाभूल झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.
हुबाले यांनी पुढे सांगितले की, सभापती आणि सचिव यांनी संगनमत करून ही संपूर्ण प्रक्रिया राबवली आहे. आपल्या ‘बगलबच्च्यांना’ टेंडर मिळवून देण्यासाठीच हा प्रकार घडवून आणण्यात आला असून, जेव्हा आपल्या लोकांना टेंडर मिळण्याची शक्यता कमी झाली, तेव्हा मुद्दाम टेंडर रद्द करण्यात आले. त्यामुळे बाजार समितीतील पारदर्शकतेचा दावा फोल ठरल्याचे त्यांनी नमूद केले.
यापूर्वीही बाजार समितीच्या कारभारात आर्थिक अनियमितता झाल्याचे प्रकरण समोर आले होते. दिघंची येथील पेट्रोल पंप प्रकरणात मोठा आर्थिक घोटाळा उघडकीस आणण्यात आला होता. त्या वेळी बाजार समितीनेही अनियमिततेची कबुली दिली होती. त्यामुळे सातत्याने चुकीच्या व मनमानी कारभाराचा आलेख कायम असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
या नव्या प्रकरणात टेंडर रद्द करण्यासाठी खोटी कागदपत्रे तयार करणे, खोटी मासिक सभा दाखवणे यांसारखे गंभीर प्रकार समोर आल्याचे सांगत, दोषींवर तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासाठी पणन संचालकांकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे हुबाले यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, बाजार समितीचे सभापती कोट्यवधींची विकासकामे सुरू असल्याचा दावा करत असले, तरी प्रत्यक्षात कारभारात पारदर्शकता नसल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. शेतकऱ्यांच्या पैशातून होणाऱ्या विकासकामांमध्येच अशा प्रकारचे गैरप्रकार होत असतील, तर त्याचा फटका थेट शेतकरी वर्गाला बसत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे बाजार समितीच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधित विभागाने याची सखोल चौकशी करून सत्य बाहेर आणावे, अशी मागणी स्थानिक पातळीवरून होत आहे. तसेच, बाजार समितीतील भ्रष्ट आणि मनमानी कारभाराविरोधात लढा सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार दादासाहेब हुबाले यांनी व्यक्त केला आहे.


