अजित पवारांचा एकनाथ शिंदेंना शाब्दिक चिमटा, “तुम्हाला तुमची खुर्ची वाचवता आली नाही तर…”

0
305

माणदेश एक्सप्रेस/मुंबई : आजपासून विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होते आहे. या आधी रविवारी संध्याकाळी जी पत्रकार परिषद पार पडली त्या पत्रकार परिषदेत अजित पवार आणि एकनाथ शिंदे या दोघांमधली टोलेबाजी चर्चेत राहिली. कारण अजित पवारांची खुर्ची फिक्स आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले. त्यावर अजित पवार यांनीही त्यांना मिश्कील उत्तर दिलं. या संभाषणाची चर्चा रंगली आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यात आणि एकनाथ शिंदेंमध्ये कुठलंही शीतयुद्ध नाही असं म्हटलं आहे.

 

 

प्रसिद्धीमाध्यमांनी विरोधकांचे काम करू नये. मी व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये कोणतेही ‘शीतयुद्ध’ नसून प्रसिद्धीमाध्यमांनी आमच्यामध्ये भांडणे लावणे चुकीचे असल्याचे परखड मतप्रदर्शन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केले. तर मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीच्या अदलाबदलीचे आमच्यात ‘अंडरस्टँडिंग’ असल्याचे शिंदे यांनी मिश्कीलपणे पत्रकारांना सांगितले. महायुतीमध्ये सर्व पक्षांचे नेते एकत्र असून विरोधकांमध्ये मात्र फाटाफूट आहे. त्यांची संख्या कमी असली तरी त्यांचा योग्य सन्मान राखला जाईल आणि विधिमंडळात चर्चेची पूर्ण संधी देवून त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली जातील असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

 

 

मागच्या वर्षीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पत्रकार परिषदेत मी मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर होतो तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर होते. पण आता आमच्या खुर्च्या बदलल्या असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची खुर्ची मात्र फिक्स आहे. माझे आणि देवेंद्र फडणवीस फडणवीस यांचे मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीबदलीचे ‘अंडरस्टँडिंग ’ असल्याचे शिंदे यांनी मिश्कीलपणे म्हणाले. अजित पवारांची खुर्ची फिक्स आहे म्हटल्यावर एकनाथ शिंदेंना अजित पवार यांनीही मिश्किलपणे टोला लगावला.

 

 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना आमची टीम जुनीच आहे, फक्त आमच्या दोघांच्या खुर्च्या बदलल्या आहेत, पण अजित पवारांची खुर्ची फिक्स असल्याचं मिश्कील वक्तव्य करत टोला लगावला. यावर लगेचच अजित पवार यांनीही उत्तर दिलं. “तुम्हाला (एकनाथ शिंदे) खुर्ची (मुख्यमंत्री पदाची खुर्ची) फिक्स ठेवता आली नाही, त्याला मी काय करू”, असं म्हणत अजित पवार यांनी एकनाथ शिंदेंची फिरकी घेतली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here