
माणदेश एक्सप्रेस न्यूज| बारामती – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अखेर वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणावर मौन सोडलं आहे. या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं असून, “लवकरच पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण भूमिका मांडणार,” असं वक्तव्य त्यांनी बारामती विमानतळावर माध्यमांशी बोलताना केलं.
वैष्णवी हगवणे ही राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र हगवणे यांच्या सूनबाई होती. तिचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. या प्रकरणात राजेंद्र हगवणे व त्यांचा मुलगा सुशील उर्फ शशांक हगवणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वैष्णवी आणि सुशील यांचं लव्ह मॅरेज होतं. लग्नापूर्वी हगवणे कुटुंबाकडून फॉर्च्यूनर गाडी, सोनं आणि महागडं घड्याळ अशी विविध मागणी करण्यात आल्याचा आरोप वैष्णवीच्या नातेवाईकांनी केला आहे. विशेष म्हणजे या लग्नात अजित पवार यांच्या हस्ते फॉर्च्यूनर गाडी देण्यात आली होती. यावरून मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केला होता – “हुंड्यात गाडी देताना आपण उपमुख्यमंत्री आहात हे विसरला होतात का?”
या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी प्रतिक्रिया देत स्पष्ट केलं की, “राजकीय नेत्यांना लग्नात बोलवलं जातं, त्याचप्रमाणे मी तिथे गेलो होतो. मात्र या घटनेशी माझा काहीही संबंध नाही.” तसेच त्यांनी पुणे पोलीस आयुक्तांशी संवाद साधल्याचं सांगत, “दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे,” अशी ठाम भूमिका मांडली.
राष्ट्रवादी नेत्या रुपाली ठोंबरे यांनीही अजित पवार यांची बाजू मांडताना म्हटलं, “या प्रकरणात अजितदादांचा काही संबंध नाही. त्यांनी आधीच पोलिसांशी संपर्क साधून पारदर्शक चौकशी आणि कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.”
दरम्यान, वैष्णवीच्या मृत्यूमुळे हगवणे कुटुंबातील आर्थिक, सामाजिक आणि राजकीय स्तरावर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. तपास वेगाने सुरू असून, राज्याच्या राजकारणात या प्रकरणाचे पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.