
माणदेश एक्सप्रेस न्यूज | सोलापूर
माढा तालुक्यातील कुर्डू गावात अवैध मुरूम उत्खननावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या करमाळा विभागाच्या पोलिस उपअधीक्षक (डीएसपी) अंजली कृष्णा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील फोन व व्हिडिओ कॉल संभाषणाने सध्या राज्यात मोठी खळबळ उडवली आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळासह प्रशासनातही या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे.
कुर्डू गावात रस्त्याच्या बांधकामासाठी मुरूम उत्खनन सुरू असल्याची तक्रार स्थानिक पोलिसांकडे आली होती. या तक्रारीवर पोलिस उपअधीक्षक अंजली कृष्णा स्वतः घटनास्थळी दाखल झाल्या. तेथे त्यांनी सुरू असलेल्या कामाची पाहणी करून चौकशी सुरू केली. ग्रामस्थांशी बोलताना त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली. या वेळी काँग्रेस नेते बाबा जगताप यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोन लावून अंजली कृष्णा यांच्याशी बोलण्यास दिला.
फोनवर अजित पवार यांनी स्वतःची ओळख करून देत कारवाई तातडीने थांबविण्याचे आदेश दिले. मात्र, अंजली कृष्णा यांनी त्यांचा आवाज ओळखला नाही. त्या म्हणाल्या, “मेरे फोन पर कॉल करो.” यामुळे पवार संतापले. त्यांनी नाराजी व्यक्त करत, “तुम पे अॅक्शन लुंगा, इतनी डेरिंग है तुम्हारी? मेरा चेहरा तो पहचानोगी ना…” असे म्हणत तातडीने व्हिडिओ कॉल सुरू केला.
व्हिडिओ कॉलवर अंजली कृष्णा बांधावर बसलेल्या दिसतात. त्यावेळी अजित पवार त्यांना थेट कारवाई थांबविण्याचे आदेश देताना स्पष्ट ऐकू येतात. “माझा फोन आलाय तहसीलदारांना सांगा” असेही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.
स्थानिक ग्रामस्थांनी हे उत्खनन ग्रामपंचायतीच्या परवानगीने सुरू असल्याचा दावा केला. मात्र, कोणतीही अधिकृत कागदपत्रे त्यांनी दाखवू शकली नाहीत. त्यामुळे महिला डीएसपी अंजली कृष्णा यांनी कारवाई सुरू ठेवली.
या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ आणि संभाषण सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. कायदा हातात घेणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यास आलेल्या महिला अधिकाऱ्याला उपमुख्यमंत्री थेट खडसावतात, हे प्रकरण गाजत आहे.
या प्रकरणावरून राजकीय वर्तुळातही चर्चा रंगल्या आहेत. अधिकारी कायद्याने दिलेल्या जबाबदारीनुसार कारवाई करत असताना राजकीय दबाव टाकला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे, ग्रामस्थांचा दावा खरा की अधिकारी बरोबर, याची चौकशी होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.