
माणदेश एक्सप्रेस न्युज | पुणे :
पुण्यात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या मिश्कील अंदाजात तुफान टोलेबाजी करत उपस्थित कार्यकर्त्यांना हसवले. विरोधकांच्या वारंवार होणाऱ्या आरोपांना उत्तर देताना अजितदादांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “चुलत्या-पुतण्याचं मला नका सांगू… मला मागच्या पिढीचं, आताच्या पिढीचं किंवा पुढच्या पिढीचं कोणी काही सांगू नये.”
सभेत बोलताना अजित पवार यांचा नेहमीप्रमाणे विनोदी आणि टोलेबाज अंदाज पाहायला मिळाला. त्यांनी कार्यकर्त्यांशी गप्पा मारताना पत्रकारांची नक्कल केली आणि वातावरण अधिक रंगतदार केलं. उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दादांची भाषणशैली एंजॉय केली.
अजित पवार यांनी या भाषणात काही जणांवर रोखठोक टीका केली. “माझ्याच भावकीतील काही लोकं मला सोडून गेले. कारण त्यांना वाटलं की आता आपलं सरकार येणार आणि आपण पालकमंत्री होणार. पण आता मी त्यांना पाडणार आणि ते कसे निवडून येतात ते बघणार,” असे त्यांनी आव्हानात्मक वक्तव्य केले.
दादांनी कार्यकर्त्यांना एक वेगळा संदेशही दिला. “कधी कधी तुम्हाला राग येईल, लोकं वाईट बोलतील. पण अशावेळी ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ म्हणून सोडून द्यायचं. लढत राहायचं, विश्वास ठेऊन पुढे जायचं,” असा सल्ला त्यांनी दिला.
अजित पवार यांच्या या भाषणात विनोद, टोलेबाजी आणि गंभीर इशारे यांचा उत्तम मिलाफ दिसून आला. चुलत्या-पुतण्याच्या वादाला स्पर्श करत त्यांनी विरोधकांना मिश्कीलपणे सुनावले.
या कार्यक्रमानंतर अजितदादांच्या भाषणाची चर्चा पुण्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात होत आहे. त्यांच्या चपखल भाषाशैलीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले.