
माणदेश एक्सप्रेस न्युज | नागपूर :
राज्याच्या राजकारणात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला विषय म्हणजे ठाकरे बंधूंची संभाव्य युती. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे गेल्या काही महिन्यांत वारंवार एकत्र दिसत असल्याने, आगामी महानगरपालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मनसे आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) हातमिळवणी करू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
नागपूरमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित गट) चिंतन शिबिरादरम्यान अजित पवार यांना ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले –
“कोणी कुठे एकत्र यावं, कोणी कसं रहावं हा ज्याचा त्याचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यामध्ये मी तरी नाक खुपसण्याचं काही कारण नाही. उद्धव आणि राज यांचे वडील हे सख्खे भाऊ होते, त्यामुळे ते दोघे कझिन आहेत. एकत्र, एका घरात ते लहानाचे मोठे झाले आहेत. त्यामुळे त्यांना विभक्त व्हा असं आपण सांगितलं नाही, किंवा एकत्र या असंही आपण सांगितलं नाही. त्यांना जे योग्य वाटतं ते करण्याचा अधिकार घटनेने दिला आहे. त्यामुळे त्याबद्दल आपण चर्चा करून काय मिळवणार? त्या दोघांना जे योग्य वाटतं, त्याबद्दल त्यांना शुभेच्छा.”
अजित पवार यांच्या या प्रतिक्रियेनंतर, ठाकरे बंधूंच्या युतीचा महायुतीवर काय परिणाम होईल या चर्चेला आणखी उधाण आले आहे.
गेल्या काही महिन्यांत उद्धव व राज ठाकरे यांच्यातील जवळीक स्पष्टपणे दिसून आली आहे.
जुलै महिन्यात मराठीचा मुद्दा आणि हिंदीची सक्ती या विषयावरून दोन्ही नेते वरळी डोम येथे पहिल्यांदा एका व्यासपीठावर आले.
त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाला राज ठाकरे ‘मातोश्री’वर गेले.
गणेश चतुर्थीला उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब राज ठाकरेंच्या घरचा गणपती पाहिला.
अलीकडेच दोघांमध्ये पुन्हा अनेक तास चर्चा झाली असून त्यात आगामी निवडणुकीची रणनीती हाच प्रमुख मुद्दा होता.
या सर्व भेटींमुळे ‘राज-उद्धव युती होणार का?’ या प्रश्नावर आता निश्चिततेकडे वाटचाल होत असल्याचे संकेत मिळत आहेत.
राज्याच्या राजकारणात ठाकरे बंधूंची जोडी जर एकत्र आली, तर महापालिका निवडणुकांत महायुतीसमोर मोठं आव्हान उभं राहू शकतं.
मुंबई, ठाणे, पुणे यांसारख्या महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये मनसे व शिवसेनेची एकत्रित लढत भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकते.
मराठी मतांची एकजूट होण्याची शक्यता निर्माण होईल.
शिवसेना शिंदे गट व भाजपच्या समीकरणांवरही या युतीचा थेट परिणाम होण्याची भीती महायुतीला आहे.
तथापि, अजित पवार यांनी या प्रश्नावर फारशी भूमिका घेण्याचे टाळले आहे. राजकीय समीकरणांमध्ये नेहमीच अनपेक्षित बदल होत असतात. पण, त्यांनी दिलेली प्रतिक्रिया सूचक आहे – “राज आणि उद्धव यांनी जे ठरवले ते त्यांचा निर्णय. आपण नाक खुपसण्याची गरज नाही.”
राजकारणात दोन दशकांपासून चाललेला ठाकरे बंधूंचा दुरावा आता संपुष्टात येतो का, हे आगामी काही महिन्यांत स्पष्ट होईल. मात्र, त्यांचा एकत्रित प्रवास सुरू झाला, तर राज्यातील राजकीय पटावर मोठं चित्र पालटणार हे निश्चित. अजित पवारांची “मी का नाक खुपसू?” ही प्रतिक्रिया, महायुतीच्या नेत्यांच्या मनातील खळबळ अधोरेखित करणारी ठरली आहे.