अजित पवारांच्या पक्ष कार्यालयात महिला पदाधिकाऱ्याचा लावणी नृत्याचा व्हिडिओ व्हायरल! 

0
209

माणदेश एक्सप्रेस न्यूज | नागपूर

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नागपूर कार्यालयातील दिवाळी स्नेहमिलन सोहळा सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. कारण, या कार्यक्रमात राष्ट्रवादी पक्षाच्या महिला पदाधिकारी शिल्पा शाहीर यांनी “मला जाऊ द्या ना घरी, वाजले की बारा” या लोकप्रिय लावणी गाण्यावर नृत्य सादर केलं, आणि याच नृत्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे दोन महिन्यांपूर्वी अजित पवार यांच्या हस्ते या नागपूर कार्यालयाचं उद्घाटन झालं होतं. त्यानंतर दिवाळीनिमित्त पक्षाकडून स्नेहमिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात पक्षाचे शहराध्यक्ष अनिल अहिरकर यांच्यासह अनेक महिला आणि पुरुष पदाधिकारी उपस्थित होते. या ठिकाणी झालेल्या सादरीकरणात उपाध्यक्षा शिल्पा शाहीर यांनी पारंपरिक लावणी सादर केली.


या कार्यक्रमातील व्हिडिओ समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर राष्ट्रवादीचे नागपूर शहराध्यक्ष अनिल अहिरकर यांनी स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले,

“हा कार्यक्रम आमच्या पदाधिकाऱ्यांचा कौटुंबिक स्नेहमिलन सोहळा होता. लावणी महाराष्ट्राची संस्कृती आहे. यात काहीही अशोभनीय नाही. मी स्वतःसुद्धा या कार्यक्रमात थोडं नृत्य केलं. पाहणाऱ्यांच्या नजरेत दोष आहे. आम्ही शिल्पा शाहीर यांचा सत्कारही केला.”

अहिरकर यांनी पुढे सांगितले,

“या कार्यक्रमात महिला आणि पुरुष पदाधिकारी दोघांनी मिळून नृत्य सादर केलं. सगळं वातावरण कौटुंबिक आणि सांस्कृतिक होतं. कोणी उत्कृष्ट सादरीकरण केलं तर प्रेक्षकांनी ‘वन्स मोर’ केलं, यात गैरसमज निर्माण करण्याचं काहीही कारण नाही.”


मात्र या प्रकरणावर शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी सांगितले,

“मी व्हिडिओ पाहिला नाही. पण जर हे खरं असेल तर हे लाजीरवाणं आहे. शरद पवार यांनी जो पक्ष उभा केला, तो घराघरात पोहोचवला. आणि जे लोक तो पक्ष चोरून गेले, ते आता पक्ष कार्यालयात ‘वाजले की बारा’ हे गाणं लावून नाचत आहेत. खरं तर त्यांच्या पक्षाचेच बारा वाजले आहेत!

आव्हाडांनी अजित पवार गटाच्या वर्तनावर नाराजी व्यक्त करत म्हटलं की,

“हे सगळं पक्षाच्या संस्कृतीला शोभणारं नाही. शरद पवारांनी उभा केलेल्या विचारधारेचा हा अपमान आहे.”


दरम्यान, या व्हिडिओला सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया मिळत आहेत. काहींनी हे “कलात्मक सादरीकरण” म्हणून समर्थन दिलं, तर काहींनी राजकीय कार्यकर्त्यांच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.


एकीकडे अजित पवार गट हा कार्यक्रम “सांस्कृतिक आणि कौटुंबिक” असल्याचं सांगत आहे, तर दुसरीकडे शरद पवार गट त्यावरून राजकीय हल्ले चढवत आहे.
लावणी हे महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव असलं तरी राजकीय पक्षाच्या कार्यालयात झालेल्या सादरीकरणाने नव्या वादाला तोंड फोडलं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here