
माणदेश एक्सप्रेस न्यूज | बारामती :
उपमुख्यमंत्री अजित पवार हे शुक्रवारी बारामती तालुक्यातील एका कार्यक्रमात भाषण करत असताना एक शेतकरी अचानक घोषणाबाजी करू लागला. “कर्जमाफी करा… कर्जमाफी करा…” अशी घोषणा देत त्या शेतकऱ्याने सरकारविरोधात नाराजी व्यक्त केली. या घोषणांवर अजित पवार यांनी संयमाने प्रतिक्रिया देत म्हणाले, “ऐ बाळ, माझं ऐक तरी…” आणि त्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांना उद्देशून सविस्तर उत्तर दिलं.
अजित पवार म्हणाले, “आमचं सरकार कर्जमाफी करणार नाही, असं आम्ही कधीच बोललो नाही. पण राज्याची आर्थिक परिस्थिती समजून घेतली पाहिजे. नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी आम्ही आतापर्यंत ३२ हजार कोटी रुपयांची मदत दिली आहे. यात कर्ज न काढलेल्या शेतकऱ्यांनाही आधार मिळाला आहे. त्यामुळे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं आहे.”
ते पुढे म्हणाले, “पूर्वी देशभरात ७१ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी झाली होती. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनेही काही हजार कोटींची कर्जमाफी केली. आणि आम्ही सत्तेत आलो तेव्हाही काही हजार कोटींची कर्जमाफी केली होती. त्यामुळे महायुती सरकारने जाहीरनाम्यात दिलेलं आश्वासन आम्ही विसरलो नाही. योग्य वेळी यावर निर्णय घेतला जाईल.”
अजित पवार यांनी राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत सविस्तर माहिती देताना सांगितलं की, “राज्याचं एकूण बजेट हे जवळपास ८ लाख कोटी रुपयांचं आहे. त्यातील तब्बल ४ लाख कोटी रुपये हे फक्त सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगार आणि पेन्शनसाठी खर्च होतात. महिलांसाठी वर्षाला ४५ हजार कोटी रुपये, तर शेतकऱ्यांच्या वीजबिलासाठी २२ ते २३ हजार कोटी रुपये दिले जातात. एवढा मोठा भार असूनही आम्ही शेतकऱ्यांना मदत करतो आहोत.”
कार्यक्रमादरम्यान अजित पवार यांच्या भाषणात सतत “कर्जमाफी”ची मागणी करणाऱ्या त्या शेतकऱ्याला उपस्थित लोकांनी शांत बसवले. मात्र, पवार यांनी त्याच्यावर नाराजी न दाखवता, त्याच्या भावना समजून घेत सविस्तर उत्तर दिल्यामुळे उपस्थितांकडून टाळ्यांचा कडकडाट झाला.
भाषणाच्या शेवटी पवार म्हणाले, “शेतकऱ्यांची वेदना आम्हाला समजते. पण केवळ घोषणा देऊन समस्या सुटत नाही. सरकार पाऊल टाकतंय, पण त्यासाठी वेळ आणि शिस्त आवश्यक आहे. आपण सगळे मिळून काम केलं, तर शेतकऱ्यांचं भविष्य उज्ज्वल होईल.”


