
माणदेश एक्सप्रेस न्यूज | पुणे :
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या चिरंजीव पार्थ पवार यांच्या कंपनीवर पुण्यातील कोरेगाव पार्क येथील 1800 कोटींच्या जमिनीच्या खरेदी व्यवहारात मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप होताच राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरून विरोधकांनी अजित पवार यांच्यावर टीकेचे तीव्र हल्ले चढवले असून, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी तर भाषेची सारी मर्यादा ओलांडत उपमुख्यमंत्र्यांवर थेट व्यक्तिगत टीका केली आहे.
लक्ष्मण हाके यांनी पत्रकार परिषदेत अजित पवारांवर निशाणा साधताना म्हटलं,
“अजित दादा पवार हे महाराष्ट्राच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे दरोडेखोर आहेत. त्यांच्या दोन दिवट्यांपैकी एक दारूचा कारखाना चालवतो, आणि दुसरा जमिनीचा घोटाळा करतो. त्यामुळे अजितदादांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू.”
हाके यांनी पुढे दावा केला की, पार्थ पवार यांच्या मालकीच्या अमिड (Amid) कंपनीची स्थापना थेट अजित पवार यांच्या शिवाजीनगर येथील घरातून झाली, त्यामुळे या प्रकरणाचा अजित पवारांशी थेट संबंध असल्याचे त्यांनी सांगितले.
पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील सुमारे 5 एकर जमीन कृषी विभागाच्या नावावर होती, अशी माहिती समोर आली आहे. मात्र ही जमीन पार्थ पवार यांच्या कंपनीला केवळ 300 कोटींना विकण्यात आली, असा गंभीर आरोप केला जात आहे.
या प्रकरणात सरकारी अधिकाऱ्यांच्या संगनमताचा संशय व्यक्त होत असून, तहसीलदार, काही महसूल अधिकारी आणि कंपनीचे प्रतिनिधी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी विविध संघटनांकडून होत आहे.
हाके यांनी पवार कुटुंबावर हल्ला चढवत म्हटलं,
“पवार कुटुंब हे ब्रिटिश इंडिया ईस्ट कंपनी आहे. अजितदादा पवार हा पोल्ट्री वाला माणूस आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा. जर तसं झालं नाही तर आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार करणार.”
तसेच त्यांनी भाजपवरही टीका करत म्हटलं,
“भाजपाचं भांडवल म्हणजे पवार कुटुंब आहे. त्यामुळेच भाजपने त्यांना जवळ केलं आहे. पण हे नातं महाराष्ट्राच्या राजकारणासाठी घातक ठरणार आहे. ही घटना म्हणजे फक्त हिमनगाचे टोक आहे; पुढे भाजप बेदखल होईल,” असा इशारा हाके यांनी दिला.
राज्याच्या राजकारणात ‘दुहेरी निकष’ वापरले जात असल्याचा आरोप करताना हाके म्हणाले,
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांचा त्वरित राजीनामा घ्यावा. धनंजय मुंडे यांना एक न्याय आणि अजित पवारांना दुसरा न्याय – असे का? असे अजित पवार कोण आहेत?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
लक्ष्मण हाके यांनी मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत म्हटलं,
“जरांगे यांना मारण्याचा कट कोणी केला असेल, तर हे गंभीर आहे. आरोपींवर कडक कारवाई झाली पाहिजे. मनोज जरांगे पाटील यांना कोणतीही जखम होता कामा नये. ते चांगल्या पद्धतीने जगले पाहिजेत, वागले पाहिजेत,” असे ते म्हणाले.
पार्थ पवार यांच्या अमिड प्रोजेक्ट्स या कंपनीने पुण्यातील महार वतनाची जमीन विकत घेतल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी झाला होता. ही जमीन सरकारी नियमांनुसार विक्रीयोग्य नसल्याने या व्यवहारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
या प्रकरणात संबंधित महसूल विभागातील अधिकाऱ्यांची भूमिका, नोंदणी प्रक्रियेतील घाईगडबड आणि मूळ मालकांच्या परवानगीशिवाय केलेला व्यवहार हे घटक संशयाच्या भोवऱ्यात आहेत.
या प्रकरणानंतर पवार कुटुंबावर पुन्हा एकदा नैतिकतेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. विरोधक आता या प्रकरणावरून उपमुख्यमंत्र्यांना राजीनाम्याची मागणी करत आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गटाच्या) नेत्यांनी मात्र या आरोपांना राजकीय षड्यंत्र ठरवत अजित पवारांच्या बाजूने भूमिका घेतली आहे.
पुण्यातील या वादग्रस्त जमीन प्रकरणाने राज्यातील राजकारण तापवले आहे. एकीकडे अजित पवार आणि त्यांचा परिवार बचावाच्या भूमिकेत आहे, तर दुसरीकडे विरोधकांनी “दरोडेखोर, दिवटे, ब्रिटिश कंपनी” अशी तीव्र शब्दयुद्धाची मोहीम सुरू केली आहे. या प्रकरणाचा तपास आणि राजकीय परिणाम पुढील काही दिवसांत महाराष्ट्राच्या सत्तेच्या समीकरणांवर मोठा प्रभाव टाकू शकतात.


