
माणदेश एक्सप्रेस न्यूज | मुंबई/सोलापूर :
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यातील कुडोवाडीतील अवैध मुरूम उत्खनन प्रकरणावरून झालेला वाद आता नव्या वळणावर पोहोचला आहे. या वादाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यभर राजकीय वादळ उठले. विरोधकांनी अजित पवारांवर दादागिरीचे आरोप केले तर पवारांनी महिलांविषयी आपला सर्वोच्च आदर असल्याचे सांगत नुकसानभरपाईचे प्रयत्न केले. परंतु प्रकरण इथेच थांबले नाही. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेतील आमदार अमोल मिटकरी यांनी थेट UPSC ला पत्र लिहून अंजना कृष्णा यांच्या सर्व कागदपत्रांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
५ सप्टेंबर २०२५ रोजी UPSC च्या सचिवांना लिहिलेल्या पत्रात आमदार मिटकरी यांनी अंजना कृष्णा यांनी सेवेत दाखल होताना सादर केलेल्या शैक्षणिक पात्रता, जात प्रमाणपत्र तसेच इतर कागदपत्रांची पडताळणी करण्याची मागणी केली आहे.
मिटकरींचा रोख असा आहे की, “पारदर्शकतेसाठी ही चौकशी होणे आवश्यक आहे. एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सेवा प्रवेश प्रक्रियेत काही अनियमितता केली असेल, तर ती बाहेर आली पाहिजे.”
सोलापूर जिल्ह्यातील कुडोवाडी गावात अवैध मुरूम उत्खनन सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस ताफ्यासह आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांनी तेथे धडक मारली. कारवाई सुरू असतानाच राष्ट्रवादी कार्यकर्ता बाबा जगताप याने थेट अजित पवारांना फोन केला.
👉 त्यावर पवारांनी कृष्णा यांना कारवाई थांबवण्याचे आदेश दिल्याचे दिसते.
👉 आदेश न मानल्यास कडक कारवाई होईल असा इशाराही दिल्याचे कथित संभाषणात ऐकू आले.
👉 मात्र, कृष्णा यांनी “आपली ओळख सांगा, आम्ही कारवाई सुरू ठेवणार” असे सांगत काम थांबवले नाही.
👉 याच घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि वादाला तोंड फुटले.
या प्रकरणानंतर विरोधकांनी अजित पवारांवर दादागिरीचे आरोप केले. काँग्रेस–शिवसेनेच्या नेत्यांनी महिलांविरुद्ध अपमानजनक वागणूक दिल्याचा आरोप करत दादांना घेरले.
मात्र अजित पवार यांनी बचाव करताना “अधिकाऱ्यांना धक्का लागू नये, परिस्थिती चिघळू नये म्हणूनच मी तो निर्णय घेतला. महिलांविषयी माझा सर्वोच्च आदर आहे” असे विधान केले.
त्याचवेळी राष्ट्रवादी आमदार रोहित पवार यांनीही “दादांना मित्रपक्षच अडचणीत आणत आहेत” असे म्हणत अप्रत्यक्ष टोला लगावला.
अजित पवार यांच्यासोबत झालेल्या संभाषणानंतर अंजना कृष्णा यांच्या “वर्तणुकीवरून नाराजी” व्यक्त झाल्याचे चित्र आहे. काहींनी त्यांचे कौतुक केले तर काहींनी वरिष्ठांच्या आदेशाला न जुमानल्याचा आरोप केला.
याच पार्श्वभूमीवर आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्याची मागणी करून या प्रकरणात नवा अध्याय सुरू केला आहे.
आता UPSC या पत्रावर काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जर चौकशीचा निर्णय झाला, तर संपूर्ण प्रक्रिया लांबणीवर जाऊ शकते.
दरम्यान, या प्रकरणाचा राजकीय फायदा–तोटा कोणाला होईल, याकडेही सर्वांचे डोळे लागले आहेत.