
माणदेश एक्सप्रेस न्युज | सोलापूर :
राज्यातील अनेक भागांत गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेषत: सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीला आलेल्या महापुरामुळे अनेक गावांमध्ये भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून यामुळे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी मोठ्या प्रमाणावर होत आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी (२४ सप्टेंबर) सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांची पाहणी केली.
करमाळा तालुक्यातील कोर्टी गावाच्या शिवारात अजित पवार यांनी पिकांच्या झालेल्या नासाडीची पाहणी केली. शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या समजून घेतल्या. यावेळी काही शेतकऱ्यांनी थेट मागणी केली – “दादा, ओला दुष्काळ जाहीर करा.” त्यावर अजित पवार म्हणाले, “मी देखील शेतकरी आहे आणि तुमच्या भावना मला समजतात. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या भल्यासाठी जे काही करता येईल, ते नक्की करेल. पण आधी आम्हाला पाहणी करू द्या. प्रत्यक्ष परिस्थितीचा अभ्यास केल्यावरच निर्णय घेतला जाईल.”
काही शेतकऱ्यांनी सांगितले की, आमच्या भागात ६५ मिमी पाऊस झाला आहे. यावर अजित पवार म्हणाले, “हे डोक्यातून काढून टाका. इथे एका दिवसात ६५ मिमी पाऊस झालेला नाही. रोज थोडा थोडा पाऊस झाला आणि वरच्या भागातून आलेल्या पाण्यामुळे सीना नदीला पूर आला. त्यातूनच गावांमध्ये शिरून मोठे नुकसान झाले.”
पुढे ते म्हणाले, “मी स्वतः डोळ्यांनी परिस्थिती पाहिली आहे. त्यामुळे काळजी करू नका. सरकारकडून आवश्यक ती मदत दिली जाईल.”
पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मदत तत्काळ पोहोचवण्यासाठी प्रशासनाला अजित पवार यांनी काटेकोर नियोजन करण्याचे आदेश दिले. पंचनामे त्वरित सुरू करण्याचे निर्देश देत त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा योग्य तो अहवाल तयार करून शक्य तितक्या लवकर मदत द्यावी.
पूरस्थितीमुळे अजित पवारांचे अनेक पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द किंवा पुढे ढकलण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्यातील खडकवासला येथे २४ आणि २५ सप्टेंबर रोजी होणारा ‘जनसंवाद’ कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पालकमंत्र्यांना व आमदारांना स्पष्ट निर्देश दिले आहेत की, आपल्या जिल्ह्यात किंवा मतदारसंघात जाऊन प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या समस्या समजून घ्याव्यात. बाधित गावांना भेटी द्याव्यात, शेतकऱ्यांना दिलासा द्यावा आणि प्रशासनाकडून पंचनामे तातडीने करून घ्यावेत.
सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांनी सरकारकडे ‘ओला दुष्काळ’ जाहीर करण्याची मागणी केली असली, तरी अजित पवारांनी यावर तातडीने उत्तर न देता पाहणी करून निर्णय घेऊ, असे सांगितले. मात्र पूरग्रस्त शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत देण्याबाबत प्रशासनाला त्यांनी स्पष्ट सूचना दिल्या आहेत.