
माणदेश एक्सप्रेस न्यूज | मुंबई :
सोलापूर जिल्ह्यात महिला पोलीस उपअधीक्षक (डीएसपी) अंजना कृष्णा यांच्याशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या ‘दादागिरीच्या भाषेचा’ व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेत सोलापूर जिल्हाधिकार्यांकडून संपूर्ण अहवाल मागवला आहे.
सोलापूर ग्रामीण विभागातील अवैध मुरूम उत्खनन रोखण्यासाठी महिला पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा स्वतः घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. नियमानुसार कारवाई सुरु असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट फोन करून “कारवाई करू नका” असा आदेश दिला. या दरम्यान वापरलेली त्यांची दमदाटीची भाषा व्हिडिओसह सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यानंतर राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चा रंगली असून विरोधी पक्षांनी पवार यांच्या राजीनाम्याची व कारवाईची मागणी केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकाराला स्पष्टपणे विरोध दर्शवला आहे. ते म्हणाले की –
“नियमांनुसार काम करणाऱ्या अधिकाऱ्याला रोखणे हे राज्यातील प्रशासनासाठी योग्य नाही. राजकीय पदाधिकाऱ्यांच्या दबावाखाली अधिकार्यांना थेट दमात घेणे हा प्रकार मान्य नाही. आदेश देण्याआधी वस्तुस्थिती तपासणे आवश्यक आहे.”
मुख्यमंत्री फडणवीस यांनी या संदर्भात जिल्हाधिकार्यांकडून संपूर्ण अहवाल मागवला आहे. तसेच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी अजित पवार यांच्या वागणुकीबद्दल नाराजी व्यक्त केली.
घटनेनंतर विरोधकांच्या तीव्र टीकेला सामोरे जाताना अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी म्हटले की, “महिला अधिकार्यांना रोखण्याचा माझा हेतू नव्हता. परिस्थितीची नीट माहिती घेऊनच निर्णय घेतला जाईल.” मात्र हे स्पष्टीकरण विरोधकांना पटलेले नाही.
या प्रकरणावर विरोधी पक्ष भाजप-शिवसेनेच्या नेत्यांसह काँग्रेस, मनसे यांनीही जोरदार हल्ला चढवला आहे. “कायद्यापेक्षा वर कुणीही नाही. उपमुख्यमंत्री स्वतः कायदा मोडणाऱ्यांच्या बाजूने उभे राहतात हे दुर्दैवी आहे”, अशा शब्दांत विरोधकांनी टीका केली.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे अहवाल आल्यानंतर या प्रकरणावर पुढील निर्णय होणार आहे. कायदेशीर कारवाई आधीच सुरु असल्याचे त्यांनी सांगितले असले तरी पवारांवर शिस्तभंगाची कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.