
माणदेश एक्सप्रेस न्यूज | मुंबई :
राजकीय क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या ठाकरे कुटुंबातील एका सदस्याने थेट बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली आहे. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा नातू आणि स्मिता ठाकरे यांचा धाकटा मुलगा ऐश्वर्य ठाकरे (Aaishvary Thackeray) ‘निशांची’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करतोय. या चित्रपटाचा दमदार ट्रेलर बुधवारी प्रदर्शित झाला असून, चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
२ मिनिटे ४९ सेकंदांचा हा ट्रेलर अॅक्शन, रोमान्स, कॉमेडी आणि कौटुंबिक ड्रामाने परिपूर्ण असा आहे. ऐश्वर्य ठाकरेनं बबलू आणि डबलू या जुळ्या भावांची भूमिका साकारली आहे. ट्रेलर पाहताना प्रेक्षकांना त्याची एन्ट्री स्टाईल, ऍक्शन सिक्वेन्सेस आणि डायलॉग डिलिव्हरीने खास भुरळ घातली आहे. बॉलिवूडमध्ये पदार्पण करताच ऐश्वर्य दुहेरी भूमिकेत दिसणार असल्याने त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत.
या चित्रपटाचं दिग्दर्शन बॉलिवूडचे ख्यातनाम दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी केलं आहे. आपल्या खास वास्तववादी शैलीसाठी ओळखले जाणारे कश्यप यांनी म्हटलं, “अमेझॉन एमजीएम स्टुडिओज् इंडियासोबत काम करण्याचा अनुभव खूपच चांगला होता. त्यांनी माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवला. ऐश्वर्य, वेदिका, मोनिका, झिशान, कुमुद आणि संपूर्ण टीमने केवळ अभिनयच केला नाही, तर या पात्रांना जगले आहे. त्यांच्या कामातील तळमळ आणि प्रामाणिकपणा या चित्रपटात दिसून येतो.”
या चित्रपटात ऐश्वर्यसोबत वेदिका पिंटो, मोनिका पंवार, मोहम्मद जीशान अय्यूब आणि कुमुद मिश्रा यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. विविध अंगांनी परिपूर्ण असा हा अस्सल मसालापट असल्याने चित्रपटगृहांमध्ये त्याला चांगला प्रतिसाद मिळण्याची दाट शक्यता आहे.
अमेझॉन एमजीएम स्टुडिओज् इंडियाने निर्मित केलेला ‘निशांची’ हा चित्रपट १९ सप्टेंबर रोजी संपूर्ण देशभरातील सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
ऐश्वर्य ठाकरे गेल्या काही वर्षांपासून सिनेइंडस्ट्रीत कार्यरत आहे. त्याने संजय लीला भन्साळी यांच्या ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून अनुभव घेतला होता. आता तो थेट नायकाच्या भूमिकेत झळकणार आहे.
त्याची आई स्मिता ठाकरे या हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील परिचित नाव आहे. त्यांनी ‘हसीना मान जायेगी’ या चित्रपटाची निर्मिती केली असून, मराठी व हिंदी मालिकांमध्येही त्या निर्माती म्हणून सक्रिय होत्या.
‘निशांची’च्या ट्रेलरने प्रेक्षकांमध्ये उंचावलेली अपेक्षा पाहता ऐश्वर्य ठाकरे बॉलिवूडमध्ये दमदार पाऊल ठेवणार, याबाबत चित्रपटसृष्टीतही चर्चांना उधाण आलं आहे. ठाकरे कुटुंबातील वारसाची ही नवी सुरुवात कितपत रंगते, हे पाहण्यासाठी आता सगळ्यांची नजर १९ सप्टेंबरकडे लागली आहे.