
माणदेश एक्स्प्रेस न्यूज
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ताज महल पॅलेस हॉटेलला बॉम्बने उडवून देण्याची धमकीचा ईमेल मुंबई पोलिसांना प्राप्त झाला आहे. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करून सर्व यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे. धमकीच्या ईमेलमध्ये दहशवादी अफजल गुरू याच्या नावाचा उल्लेख करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मुंबईतील विमानतळ पोलिसांना अज्ञात व्यक्तीने ईमेल केला आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ताज महल पॅलेस हॉटेल पाईप बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली आहे. संसदेवरील हल्ल्याप्रकरणी फाशी झालेला दहशतवादी अफजल गुरूला फाशी दिल्याचा आणि सॅवक्कू शंकर याच्या नावाचा उल्लेख या ईमेलमध्ये करण्यात आला आहे. या धमकीच्या ईमेलनंतर सर्व यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. मेल पाठवणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत येत्या तीन दिवसात बॉम्बस्फोट होणार असल्याचा ईमेलही १३ मे रोजी मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागाला मिळाला होता. त्याबाबत मुंबई पोलिसांना कळवण्यात आले असून सायबर पोलीस अधिक तपास करत आहेत. आता विमानतळ पोलिसांनाही ईमेल मिळाला आहे. त्याच्या सत्यतेबाबत पोलीस तपास करत आहेत.
ऑपरेशन सिंदूरनंतर सर्व यंत्रणा सतर्क ऑपरेशन सिंदूरनंतर मुंबईत सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सरकारी आस्थापना, संवेदनशील ठिकाणे व धार्मिक स्थळे, परदेशी वकिलाती व रेल्वे स्थानकांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. संवेदनशिल ठिकाणी बॉम्ब शोधक व नाशक पथकातपासणी करण्यात आली. रेल्वे पोलिसांनी मुंबईतील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर घातपात विरोधी तपासणी करण्यात आली. त्यात चर्चगेट, सीएसएमटी, लोकमान्य टिळक टर्मिनस, कुर्ला, मुंबई सेंट्रल, अंधेरी, चेंबूर, गोवंडी, बोरीवली या रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. यावेळी पोलिसांनी ठिकठिकाणी रुटमार्च केला. यावेळी रेल्वे स्थानकांवरील पूल, फलाट, अडगळीची ठिकाणे, संशयीत व्यक्ती व बॅगांची तपासणी करण्यात आली.
विशेष करून लांब पल्ल्यांच्या वाहनांची सुरक्षा तपासणी करण्यात आली. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईत फटाके वाजवून नयेत, तसेच रॉकेट उडवून नये, असे आदेश मुंबई पोलिसांनी जारी केले आहेत. उपायुक्त(अभियान) अकबर पठाण यांनी याबाबतचे आदेश जारी केले असून ही बंदी ११ मे पासून ९ जूनपर्यंत आहे. महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १० मधील पोटकलम २ अंतर्गत मिळालेल्या अधिकारांतर्गत उपायुक्तांनी हे आदेश जारी केल्याची माहिती पोलिसांनी दिली. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीविरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना सर्व पोलिसांना देण्यात आल्या आहेत.