खर्च कमी होऊन उत्पादन वाढीसाठी ‘AI’ चा वापर होणार; शेतकऱ्यांसाठी अजित पवारांची माहिती

0
63

माणदेश एक्सप्रेस/मुंबई : शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्याबरोबरच त्यांच्या उत्पादन खर्चात बचत करण्यासाठी येत्या काळात कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (‘एआय’चा) वापर अनिवार्य आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडवण्यासाठी कृषी क्षेत्रात प्रायोगिक तत्त्वावर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर विचाराधीन आहे. त्यासाठी कृषी विभागाने सहकार विभागासोबत समन्वय करून या प्रकल्पाची तांत्रिक आणि आर्थिक व्यवहार्यता तपासून पाहावे,” अशा सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत.

 

राज्यातील कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल (दूरदृष्यप्रणालीद्वारे), सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.

 

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, “जगभरातील प्रत्येक क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे क्रांतिकारी बदल घडत आहेत. कृषी क्षेत्र सुद्धा याला अपवाद नाही. येत्या काळात बदलते हवामान, अवेळी पडणारा पाऊस, पीकांवर वारंवार होणारा रोगांचा प्रादुर्भाव, मजुरांचा तुटवडा यांवर मात करत शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्याबरोबरच त्यांच्या उत्पादन खर्चात बचत करण्यासाठी कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेला पर्याय नाही. कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केल्यामुळे पीक आरोग्याचे विश्लेषण, मातीतील कार्बन प्रमाण शोधणे, मातीच्या आरोग्याची सविस्तर माहिती, तणाचा प्रकार ओळखणे, पूर्वीच्या उत्पन्नाची तुलना, मातीचे तापमान, वातावरणातील आर्द्रता, पिकांवरील कीड व रोगांचा प्रादुर्भाव ओळखणे, तसेच पिकांवरील जैविक-अजैविक ताण ओळखणे शक्य होणार आहे.”

 

दरम्यान, “कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर केल्यास पीकांच्या उत्पादनात वाढ, मजुरी खर्चात बचत, रसायनिक खते व औषधांच्या वापरात कपात, कापणी कार्यक्षमतेत वाढ, रोगनियंत्रणाद्वारे बचत, पुरवठा साखळीतील कार्यक्षमतेत वाढ आणि एकूण खर्चात कपात होणे शक्य होईल. राज्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक आणि आमूलाग्र बदल घडविण्यासाठी कृषी क्षेत्रात प्रायोगिक तत्त्वावर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर विचाराधीन आहे. त्यासाठी कृषी विभागाने सहकार विभागासोबत समन्वय करून या प्रकल्पाची तांत्रिक व आर्थिक व्यवहार्यता तपासून पाहावी,” असे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here