अहमदाबाद विमान अपघातावर सर्वोच्च न्यायालयाचा संताप; पायलटची चूक की इंधनाचा प्रश्न?

0
171

माणदेश एक्सप्रेस न्यूज | नवी दिल्ली/अहमदाबाद :
गुजरातच्या अहमदाबाद विमानतळावरून 12 जून 2025 रोजी लंडनच्या दिशेने निघालेल्या एअर इंडियाच्या बोईंग ड्रीमलायनर 171 विमानाचा झालेला भीषण अपघात आजही देशाला हादरवतो आहे. टेकऑफच्या काही सेकंदांतच या विमानाने आकाशात भीषण घाव घेतला आणि क्षणार्धात जमिनीवर कोसळले. या भीषण दुर्घटनेत तब्बल 270 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर केवळ एकच प्रवासी चमत्कारिकरित्या वाचला. एका संपूर्ण कुटुंबासह शेकडो जीव घेऊन गेलेल्या या अपघाताच्या चौकशीवर आता सर्वोच्च न्यायालयानेच गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.


या अपघातानंतर सेफ्टी मॅटर्स फाउंडेशन नावाच्या संस्थेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेत विमान अपघाताच्या चौकशीबाबत मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करण्यात आला. सुनावणीदरम्यान न्यायालयाने केंद्र सरकारला थेट नोटीस बजावली असून चौकशीच्या कामगिरीवर संताप व्यक्त केला आहे.

लाईव्ह लॉच्या वृत्तानुसार, सर्वोच्च न्यायालयाने एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) च्या प्राथमिक अहवालाला बेजबाबदार ठरवले आहे. कारण – या अहवालात अपघाताचे स्पष्ट कारण नमूद केलेले नाही. फक्त “पायलटची चूक असावी” किंवा “इंधन कमी असावे” असा संशय व्यक्त करण्यात आला. मात्र, ठोस पुरावे किंवा अंतिम निष्कर्ष मांडण्यात आलेला नाही.


अपघाताला आता तब्बल 100 दिवस झाले आहेत. तरीदेखील केवळ प्राथमिक अहवालच सादर करण्यात आला आहे. प्रख्यात वकील प्रशांत भूषण यांनी कोर्टात म्हटले की, इतक्या मोठ्या प्रमाणात झालेल्या अपघातानंतर जबाबदारी निश्चित होणे अपेक्षित होते. पण एएआयबीने फक्त संशय व्यक्त करून हात झटकला आहे.

भूषण म्हणाले –
“एअर इंडियाचे हे विमान एक अनुभवी पायलट उडवत होते. मग टेकऑफच्या काही सेकंदात एवढा भीषण अपघात कसा झाला? आजवर फक्त प्राथमिक अहवाल आलाय, त्यातही अपघाताचे खरे कारण लपवले गेले आहे. अशा बेपर्वाईमुळे प्रवाशांच्या जीवितहानीवर पडदा टाकला जातोय.”


या अपघाताचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आले. विमान हवेत उडाल्यानंतर काही क्षणांतच त्यात अचानक मोठा स्फोट झाल्याचे दिसते. त्यानंतर विमान जळत जळत जमिनीवर आदळले. हा दृश्य पाहून लोकांना एअर इंडियाच्या सुरक्षाव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.


सर्वोच्च न्यायालयाने आता केंद्र सरकारला स्पष्ट अहवाल मागवला आहे. स्वतंत्र चौकशीसाठी मागणी वाढू लागली असून, अपघाताचे खरे कारण उघडकीस येणे गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
दरम्यान, मृत प्रवाशांच्या कुटुंबीयांनी एअर इंडियावर निष्काळजीपणाचे आरोप लावत न्याय मिळवण्यासाठी आवाज उठवला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here