
माणदेश एक्सप्रेस न्यूज | पुणे
पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्रकार परिषदेदरम्यान एक अनपेक्षित प्रसंग घडला. एका युवकाने थेट नोकरीची मागणी करताच अजित पवार चांगलेच संतापले. “ए, ही पद्धत नाही बोलायची” अशा शब्दांत त्यांनी त्या व्यक्तीला सुनावले. अजित पवार हे नेहमीच थेट आणि स्पष्ट बोलण्यासाठी ओळखले जातात, मात्र यावेळी त्यांनी संयम राखत त्या तरुणाला शिस्तीत समजही दिली आणि नियमात बसत असेल तर मदतीचे आश्वासनही दिलं.
पत्रकार परिषदेत घडला नाट्यमय प्रसंग
अजित पवार माध्यमांशी संवाद साधत असताना अचानक एक तरुण पुढे आला आणि “दादा, मला गव्हर्नमेंट जॉब द्या” अशी मागणी करू लागला. यावर सुरुवातीला अजित पवारांनी सांगितलं की, “हे क्रीडा विषयाशी संबंधित आहे. इथेच क्रीडामंत्री दत्ता भरणे आहेत, त्यांच्याशी संपर्क करा.” पण तरीही त्या युवकाने बोलणं थांबवलं नाही, तेव्हा अजितदादा थोडेसे चिडले.
“तू सरकारच्या धोरणात बसत असशील, तर…”
अजित पवार म्हणाले, “ए, ही पद्धत नाही बोलायची. मी माहिती घेईन. तुझं अर्ज पाहीन. सरकारचं धोरण आहे, त्यात तू बसत असशील तर शंभर टक्के तुझं काम होईल. नाही बसत, तर तुला स्पष्ट कळवू.” त्यांनी त्या युवकाला शांतपणे, पण ठामपणे उत्तर देत संवाद संपवला.
कोकाटे राजीनामा प्रकरणावरही प्रतिक्रिया
या प्रसंगानंतर अजित पवारांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या चर्चेवरही भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितलं, “मी सोमवारी किंवा मंगळवारी कोकाटेंना बोलवणार आहे. त्यांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर निर्णय घेण्यात येईल.”
विरोधकांकडून सरकारवर टीका
दरम्यान, कोकाटे यांचा रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून सरकारवर चौफेर टीका होते आहे. यावर अजित पवार काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.