अग्नितांडव : एकाच कुटुंबातील 5 जणांचा होरपळून मृत्यू

0
885

माणदेश एक्सप्रेस न्युज : मुंबई : मुंबईतील चेंबूर (Mumbai Chembur Fire) परिसरात भीषण आग लागली आहे. चेंबूर परिसरात असलेल्या सिद्धार्थ कॉलनीतील दुमजली घराला आग लागली. या आगीत एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाला. सध्या अग्निशमन दलाला ही आग विझवण्यात यश आले असून या ठिकाणी कुलिंग ऑपरेशन सुरु आहे.

 

मुंबई महानगर पालिकेच्या अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, चेंबूरमधील सिद्धार्थ कॉलनीमध्ये असलेल्या चाळीतील एका दुमजली घराला पहाटे ५.१५च्या दरम्यान आग लागली. या घराच्या तळमजल्यावर एक दुकान होते. या दुकानाच्या इलेक्ट्रीक वायरिंग आणि सामनाला सुरुवातीला आग लागली. त्यानंतर ही आग पसरत गेली. यात तळमजल्यावर दुकान होते आणि वरच्या मजल्यावर एक कुटुंब राहत होते.

 

या आगीमध्ये एकाच कुटुंबातील 5 जणांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये 7 वर्षांच्या मुलीचा आणि 10 वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. पॅरिस गुप्ता (7), मंजू प्रेम गुप्ता (30), अनिता प्रेम गुप्ता (39), प्रेम गुप्ता (30), नरेंद्र गुप्ता (10) अशी मृत व्यक्तींचे नावे आहेत. ही आग शॉक सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

 

या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले. यावेळी घरात अडकलेल्या कुटुंबियांना बाहेर काढत राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारांपूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.