
माणदेश एक्सप्रेस न्यूज|मुंबई : महाराष्ट्रातील लाडक्या बहिण योजना अंतर्गत मे महिन्याचा हप्ता अद्याप लाभार्थींना मिळालेला नाही. या विलंबावर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले असून, लवकरच हप्ते वितरित होणार असल्याचे आश्वासन दिले आहे.
मंत्री आदिती तटकरे यांनी मीडियाशी संवादात सांगितले की, योजना सुरुच राहणार आहे. काही काळापूर्वी तपासणी दरम्यान आढळले की, काही सरकारी महिला कर्मचारी योजनेचा लाभ घेत आहेत. त्यामुळे त्यांना हप्ता देणे थांबवण्यात आले आहे. मात्र, सामान्य लाभार्थींना मे महिन्याचा हप्ता लवकरच देण्यात येईल.
त्याचबरोबर, मान्सूनपूर्व शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या पंचनाम्याचा आढावा घेण्याचा आदेशही त्यांनी दिला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना ऊस तोड कामगार महिलांच्या समस्या आणि अहवालाबाबत चौकशी करण्यास सांगण्यात आले आहे.
आदिती तटकरे यांनी महिला आयोगाच्या कार्यपद्धतीचा आढावा घेणाऱ्या बैठकीबाबतही माहिती दिली आणि महिला आयोगाला सुधारणा सुचविण्याचा आग्रह केला. तसेच आदिवासी विकास मंत्री अशोक ऊईके यांनीही स्वतंत्र अनुसूचित जमाती आयोग स्थापन झाल्याचे जाहीर केले, तसेच निधी कधीही कमी न झाल्याचे स्पष्ट केले.