
माणदेश एक्सप्रेस न्युज : गुजरातमधील अहमदाबाद ते महाराष्ट्रातील मुंबई या दरम्यान भारतातील पहिली बुलेट ट्रेन धावणार आहे. 508 किलोमीटरच्या या अंतरासाठी हाय स्पीड रेल्वे कॉरिडोरची निर्मिती करण्यात येत आहे. याविषयी मोठी अपडेट समोर येत आहे. एका वृत्तानुसार, 2028 पर्यंत गुजरातमधील साबरमती ते वापी यादरम्यान काम पूर्ण होईल. तर 2030 पर्यंत या मार्गावरून बुलेट ट्रेन धावेल. सीएनएन न्यूज-18 च्या एका वृत्तात याविषयीची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे बुलेट ट्रेनचे स्वप्न अजून पाच वर्षे दूर असल्याचे समोर येत आहे. नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने (NHSRCL) रायडरशिप सर्वे केला आहे.
त्यामध्ये प्रवाशी संख्या, भाडे किती असावे, ट्रॅफिक किती असेल याचा अंदाज घेण्यात आला आहे. सध्या कार, टॅक्सी, बस, एसी ट्रेन, विमान प्रवास असे पर्याय प्रवाशांकडे आहेत. त्यापेक्षा बुलेट ट्रेन त्यांच्यासाठी कशी फायदेशीर ठरेल यावर मंथन सुरू आहे. हे सर्वेक्षण राष्ट्रीय मार्ग आणि एक्सप्रेसवेच्या जवळपास सुरू करण्यात येईल. अहमदाबाद ते मुंबई 508 किलोमीटरचा टप्पा बुलेट ट्रेनसाठी असेल. गुजरातमध्ये 348 किमीचे अंतर तर महाराष्ट्रात 156 किमीची लांबी असेल. महाराष्ट्रात मुंबईत बीकेसी, ठाणे, विरार, भोईसर या स्टेशनची निर्मिती सुरू आहे.
तर गुजरातमध्ये वापी, बिलीमोरा, सुरत, भरूच, वडोदरा, आनंद, अहमदाबाद, साबरमती स्टेशन यांचा समावेश आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, आतापर्यंत 300 किमीचा वायाडक्टची निर्मिती करण्यात आली आहे. मुंबईतील BKC स्टेशनचे काम प्रगतीपथावर आहे. 383 पिअर वर्क, 401 फाऊंडेश आणि 326 किमी गर्डरचे काम पण पूर्ण करण्यात आले आहे.बुलेट ट्रेनचे गुजरातमधील काम तेजीने होत आहे. तर महाराष्ट्रात भू संपादनाचा विषयी गंभीर झाला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात काही भागांविषयी, जंगल अधिग्रहणाविषयी तीव्र मतभेद समोर आले होते. त्यामुळे पर्यावरणाला मोठा धक्का लागण्याची भीती व्यक्त होत होती. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर भारताचा त्या 15 देशांच्या यादीत समावेश होईल, जिथे बुलेट ट्रेन धावते.