आटपाडी : झरे येथे महिलेसह कुटुंबावर हल्ला; आटपाडी पोलिसात गुन्हा नोंद

0
724

माणदेश एक्सप्रेस न्यूज | आटपाडी (सांगली) :
झरे (ता. आटपाडी) येथे पती, पत्नी व मुलावर गंभीर हल्ल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  वनिता प्रकाश वाघमारे (वय ३२) यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, गावातीलच समाधान दादा सरगर व त्याची मोठी बहिण यांनी काठी व बिअरच्या बाटलीने हल्ला करून शिवीगाळ, धमकी व मारहाण केल्याची घटना १५ ऑगस्ट रोजी घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.


घटनेचा सविस्तर तपशील

सौ. वनिता वाघमारे या आपल्या पती प्रकाश, सासू सुमन व दोन मुलांसोबत झरे येथे राहतात. त्यांचा मुलगा श्रेयश हा जवाहरलाल नेहरू विद्यालयात दहावीचा विद्यार्थी आहे. त्याच शाळेत समाधान सरगर हा बारावीला शिकत आहे.

१५ ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास, शाळेतून परतताना म्हाकुबाई मंदिराजवळ समाधान सरगर याने काठीने श्रेयशवर हल्ला केला. जखमी अवस्थेत श्रेयश घरी परतला व त्याने आई-वडिलांना संपूर्ण प्रकार सांगत जखमाही दाखवल्या.

यानंतर दुपारी सुमारास एक वाजता वनिता, तिचे पती प्रकाश व मुलगा श्रेयश यांनी सरळ समाधान सरगरच्या घरी जाऊन हकीकत विचारली. त्यावेळी समाधान सरगर याने अंगावर चढून शिवीगाळ करत बिअरची मोकळी बाटली फेकून मारली. ती बाटली वनिता यांच्या उजव्या कानाजवळील डोक्याला लागल्याने त्या खाली कोसळल्या.

त्याचवेळी समाधान सरगर व त्याची मोठी बहिण (लग्न झालेली, नाव पोलिसांकडे अद्याप नोंद नाही) यांनी पती प्रकाश व मुलगा श्रेयश यांना खाली पाडून लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. यावेळी शिवीगाळ करत “तुला जिवंत ठेवणार नाही” अशी सरळ धमकीही दिली.


वैद्यकीय उपचार व पोलिसांत फिर्याद

या हल्ल्यानंतर वनिता या थेट पोलीस ठाण्यात हजर झाल्या. पोलिसांनी त्यांना त्वरित सरकारी दवाखान्यात तपासणीसाठी पाठवले. प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी त्यांना सांगली येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी पाठवले. तेथे उपचार घेतल्यानंतर वनिता यांनी पोलिसांत अधिकृत तक्रार नोंदवली.

 आटपाडी पोलीस ठाण्यात समाधान दादा सरगर व त्याची मोठी बहिण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस पुढील तपास करत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here