
माणदेश एक्सप्रेस न्यूज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी शहरात गणेशोत्सवाची धामधूम सुरू झाली असून, या उत्सवाला सांस्कृतिक रंग देणारे विविध कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या जल्लोषात होत आहेत. त्यात विशेष ठरणार आहे तो म्हणजे आटपाडीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव समितीच्या वतीने आज मंगळवार, दि. २ सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजता आयोजित करण्यात आलेला “होम मिनिस्टर” कार्यक्रम. गेल्या काही वर्षांपासून हा खेळ आटपाडीपुरता मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रभर गाजत असून, यंदा तर आकर्षक बक्षिसांच्या आतषबाजीमुळे आणि नामवंत पाहुण्यांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाबाबत सर्वत्र प्रचंड उत्सुकता आहे. त्यामुळे सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे युवक जिल्हा जिल्हा अध्यक्ष अनिलशेठ पाटील यांनी केले आहे.
यंदाच्या होम मिनिस्टर खेळात नागरिकांसाठी डबल डोअर फ्रिज, टीव्ही, आटाचक्की, सोन्याच्या नथा, कुलर अशी एकाहून एक सरस बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. गावातील व्यापाऱ्यांनी सौजन्य म्हणून ही सर्व बक्षिसे उपलब्ध करून दिल्याने आयोजक समितीबद्दल नागरिकांत समाधानाची भावना आहे. गायत्री मार्टचे विनायक वाघमारे, विक्रांत सेल्सचे तुकाराम (बापू) माळी, नदाफ शॉपी, जवळे ज्वेलर्सचे प्रसाद जवळे आणि नुजुम टीव्हीएसचे फिरोज मुलाणी यांचे या संदर्भात विशेष सहकार्य लाभले आहे.
कार्यक्रमाला रंगत आणण्यासाठी लोकप्रिय सिनेअभिनेता क्रांतीनाना माळेगावकर उपस्थित राहणार आहेत. तसेच यंदा प्रथमच “न्यु होम मिनिस्टर खेळ – पैठणीचा” हा उपक्रम राबवण्यात येणार असून, या खेळातील प्रथम सहा विजेत्यांना मानाची पैठणी प्रदान केली जाणार आहे.
संपूर्ण तालुक्यातील नागरिक या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत असून, होम मिनिस्टरचा खेळ पाहण्यासाठी आणि बक्षिसे जिंकण्यासाठी आटपाडीमध्ये मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. दिवसरात्र गजबजलेल्या बाजारपेठेत या कार्यक्रमाच्या चर्चा रंगू लागल्या असून, “आटपाडीचा राजा” समितीच्या आयोजनाने पुन्हा एकदा गावात उत्सवाचा सोहळा शिगेला पोहोचला आहे.