ॲक्शन सीन शूट करताना 20 फूटांवरून कोसळल्याने स्टंटमॅनला गमावले लागले प्राण

0
190

कार्ती आणि दिग्दर्शक पी. एस. मितरन यांच्या ‘सरदार 2’ या चित्रपटाच्या सेटवर एका स्टंटमॅनचा मृत्यू झाला आहे. एझुमलाई असं त्यांचं नाव आहे. चित्रपटातील एका ॲक्शन सीनसाठी शूटिंग करताना एझुमलाई हे 20 फूट उंचावरून खाली कोसळल्याची माहिती समोर येत आहे. ‘सरदार 2’ या चित्रपटाचं शूटिंग चेन्नईतील शालीग्रामम इथल्या एल. व्ही. प्रसाद स्टुडिओमध्ये 15 जुलैपासून सुरू झालं होतं. सेटवरील या घटनेविषयीची माहिती विरुगंबक्कम पोलिसांनी देण्यात आली असून याप्रकरणी सध्या तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सेटवर 20 फुटांवरून कोसळल्यानंतर एझुमलाई हे गंभीर जखमी झाले होते. अंतर्गत रक्तस्त्रावामुळे मध्यरात्री 1.30 वाजताच्या सुमारास त्यांचं निधन झालं. या घटनेनंतर चित्रपटाचं शूटिंग थांबवण्यात आलं आहे. या अपघाताबद्दल अद्याप दिग्दर्शक पी. एस. मितरन, कार्ती किंवा निर्मात्यांकडून कोणतीच प्रतिक्रिया समोर आली नाही. 12 जुलै रोजी सेटवरील पूजेनंतर ‘सरदार 2’ या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली होती. चेन्नईत पार पडलेल्या या पुजेला दिग्दर्शक, अभिनेता कार्ती आणि इतर क्रू मेंबर्स उपस्थित होते.

 

एझुमलाई यांनी रजनीकांत, कमल हासन, विजय, अजीत कुमार यांसारख्या मोठमोठ्या कलाकारांसाठी चित्रपटात स्टंट्स केले होते. ‘सरदार 2’ या चित्रपटातील ॲक्शन सीन्ससाठी मंगळवारी शूटिंग करत होते. तेव्हा सुरक्षेच्या अभावी ते 20 फूट उंचावरून खाली कोसळले. त्यांना लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र अंतर्गत रक्तस्राव अधिक प्रमाणात झाल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.

‘सरदार 2’ हा 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सरदार’ या चित्रपटाचा सीक्वेल आहे. यामध्ये दाक्षिणात्य अभिनेता कार्तीची मुख्य भूमिका आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली होती. एझुमलाई हे 20 फूट उंचावर एका फायटिंग सीनचा सराव करत होते. मात्र सेटवर पुरेशा प्रमाणात सुरक्षाव्यवस्था नसल्याने ते वरून कोसळले. त्यांच्या डोक्याला जबर मार लागला होता.