दादर कबुतरखान्यावरून तुफान गोंधळ; आंदोलकांनी ताडपत्र्या हटविल्या, पोलिसांसोबत जोरदार झटापट

0
102

माणदेश एक्सप्रेस न्यूज | मुंबई (दि. ६ ऑगस्ट)
मुंबईच्या दादर पश्चिम येथील प्रसिद्ध कबुतरखाना पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने ताडपत्री लावून बंद केलेल्या कबुतरखान्याच्या ठिकाणी रविवारी सकाळी आंदोलनकर्त्यांनी एकत्र येत जोरदार गोंधळ घातला. आंदोलकांनी ताडपत्र्या आणि संरक्षक बांबू हटवत कबुतरखाना उघडण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र या दरम्यान दोघांमध्ये झटापट झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

पार्श्वभूमी – आरोग्याच्या दृष्टीने गंभीर धोका

दादरमधील कबुतरखाना मागील अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. मात्र, कबुतरांच्या विष्ठेमुळे परिसरातील नागरिकांना श्वसन आणि फुफ्फुसांचे आजार होत असल्याचा आरोप करण्यात येत होता. परिणामी, स्थानिक नागरिकांनीच या कबुतरखान्याला विरोध सुरू केला होता. राज्य सरकारनेही या आरोग्यधोका लक्षात घेता मुंबई महानगरपालिकेला शहरातील कबुतरखाने बंद करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते.

या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाचीही पाठिंबा मिळाल्यानंतर महापालिकेने कारवाईचा धडाका सुरू केला. याअंतर्गत दादरच्या कबुतरखान्यावर शुक्रवारी रात्री पालिकेचे पथक आले होते. परंतु, स्थानिक नागरिकांनी अचानक एकत्र येऊन रस्त्यावरच आडवा पडत विरोध दर्शवला. त्यामुळे त्या दिवशी तोडकाम थांबवण्यात आले.

शनिवारी बंद, रविवारी आंदोलन

शनिवारी मात्र पालिकेने जोरदार बंदोबस्तात संपूर्ण कबुतरखान्यावर ताडपत्र्या लावून, संरक्षक बांबू बसवून जागा बंद केली. यामुळे कबुतरांसाठी धान्य टाकणं व वावर बंद झाला.

मात्र, रविवारी सकाळी आंदोलनकर्ते पुन्हा एकत्र आले. त्यांनी ताडपत्र्या व बांबू जबरदस्तीने काढून टाकले. यावेळी काही आंदोलनकर्त्यांनी कबुतरांसाठी पुन्हा धान्य टाकायला सुरुवात केली, त्यामुळे पुन्हा कबुतरे तेथे जमायला लागली.

पोलिसांसमोर तणावपूर्ण प्रसंग

यावेळी घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलक आणि पोलिस यांच्यात जोरदार शाब्दिक वाद झाला, काही ठिकाणी झटापटीचे प्रकार घडले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना कठोर भूमिका घ्यावी लागली.

महापालिका पुन्हा कारवाईच्या तयारीत

ही घटना लक्षात घेता, महापालिकेने पुन्हा कडक पावले उचलण्याची तयारी दाखवली आहे. सध्या घटनास्थळी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. स्थानिक प्रशासन आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी पुन्हा बैठक घेऊन पुढील रणनीती ठरवण्याचे संकेत मिळाले आहेत.

स्थानिकांची विभागलेली मते

या संपूर्ण प्रकरणावर स्थानिकांमध्ये मतविभाग जाणवत आहे. एकीकडे काही रहिवासी कबुतरखान्यामुळे आरोग्यावर परिणाम होत असल्याचा आरोप करत आहेत, तर दुसरीकडे काही नागरिक कबुतरांची पूजा आणि धार्मिक भावना यांचा दाखला देत कबुतरखान्याच्या बंदीला विरोध करत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here