
राजगुरुनगर (प्रतिनिधी) :
खेड तालुक्यातील कडूस येथील मतिमंद व्यक्तीचे अपहरण करून त्याला तब्बल दोन वर्षे गुलामाप्रमाणे वेठबिगारीस लावल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यामध्ये बंडू सहादू साळुंके (रा. वडगाव पाटोळे, ता. खेड), सचिन रघुनाथ चव्हाण (रा. कडूस, ता. खेड) तसेच दोन अनोळखी व्यक्तींना आरोपी करण्यात आले आहे.
अपहरण करून जबरदस्ती वेठबिगारी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ एप्रिल २०२३ रोजी प्रवीण ऊर्फ नागेश मधुकर टोके (वय ४३, रा. कडूस) याचे अपहरण करण्यात आले. अपहरण केल्यानंतर त्याला सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील अंदोरी येथे नेण्यात आले. तिथे स्थानिक व्यक्तीकडे त्याला डांबून ठेवण्यात आले होते.
या काळात प्रवीण टोके यांना गोठा साफ करणे, सरपण व गवत आणणे, गाई-म्हशींना पाणी पाजणे अशी कामे जबरदस्तीने करवून घेतली जात होती.
मारहाण आणि अमानुष छळ
प्रवीण कामात ढिलाई करीत असल्यास किंवा काम करण्यास नकार दिल्यास त्याला बेदम मारहाण केली जात होती. इतकेच नव्हे तर गरम सळईने पाठीवर, हातावर व कानावर चटके देत अमानुष छळ केला जात होता.
फिर्याद आणि तपास
याबाबत प्रवीण यांचा भाऊ प्रदीप मधुकर टोके (रा. गुंजवठा चास, ता. खेड) यांनी खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीवरून खेड पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपींच्या तपासाला सुरुवात केली आहे.
खेड पोलिसांकडून याबाबत पुढील तपास सुरू असून दोन वर्षे एका मतिमंद व्यक्तीला गुलामासारखे डांबून ठेवणे आणि वेठबिगारीस लावणे हा अमानुष प्रकार संपूर्ण परिसरात संताप निर्माण करणारा ठरला आहे.