लहानपणीच्या आठवणींनी रंगलेला गणेशोत्सव, प्रभाकर मोरे यांनी नेमकं काय सांगितलं?

0
60

माणदेश एक्सप्रेस न्यूज :-

मराठी मनोरंजनविश्वात आपल्या खास विनोदी अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारे ‘हास्य जत्रा फेम’ अभिनेते प्रभाकर मोरे सध्या आपल्या कोकणातील घरी गणपती उत्सवात मनसोक्त रमले आहेत. मुंबईत शुटिंगच्या धावपळीत कायम व्यस्त असलेले मोरे गणेशोत्सवाच्या काळात मात्र आपल्या चिपळूण तालुक्यातील वहाळ गावातल्या मोरेवाडीत परतले आहेत.

गावकऱ्यांसोबत, बालमित्रांसोबत आणि संपूर्ण कुटुंबियांसोबत गणरायाच्या आराधनेत त्यांचा आनंद द्विगुणित झाल्याचे दृश्य पाहायला मिळाले. गणपतीच्या आगमनानंतर मोरे यांच्या घरी सकाळ-संध्याकाळ आरतीला संपूर्ण वाडी उपस्थित असते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे भावकी एकत्र येऊन गणरायाची पूजा-अर्चा करतात.


प्रभाकर मोरे यांनी यावेळी आपल्या बालपणाच्या गमतीजमती आठवल्या. त्यांनी सांगितले की –
“आज मी कलाकार म्हणून लोकांसमोर उभा आहे, पण माझ्या या प्रवासात माझ्या गावाचा, माझ्या मित्रांचा आणि या मातीतल्या संस्कारांचा मोठा वाटा आहे. कुठेही असलो तरी गणरायाच्या दर्शनासाठी कोकणातल्या आपल्या घरी नक्की येतो.”

त्यांच्या जुन्या मित्रांनी देखील लहानपणचे अनेक किस्से सांगितले. खिशात पैसे नसताना खैर झाडं चोरून मिळवलेले पैसे, त्या पैशांत केलेले प्रवास, नाटकं सादर करण्याचा उत्साह आणि कला जोपासण्याचा हट्ट – या सगळ्यामुळे संपूर्ण वाडी भावुक झाली.


मोरे यांच्या भावंडांनीदेखील त्यांच्या संघर्षाची आठवण करून दिली. लहानपणापासून कलेचा छंद जोपासल्यामुळे भविष्यात प्रभाकर मोरे यांना मोठं व्यासपीठ मिळालं. गावातील तरुणाईला कला क्षेत्राकडे वळवण्यासाठी आजही प्रयत्न सुरू असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.

गावकरी मात्र अभिमानाने म्हणतात की – “आपला गावचा मुलगा आज मुंबईत स्टार झाला, पण आजही तो त्याच साधेपणाने, आपुलकीने गावाकडे परततो. गणरायामुळे हे बंध अजून घट्ट झाले आहेत.”


मोरे म्हणाले,
“स्टेजवर प्रेक्षकांना हसवण्याची ताकद, लोकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याची उर्मी – ही प्रेरणा मला माझ्या गावातून आणि माझ्या गणरायाकडून मिळाली. हा उत्सव म्हणजे माझ्या आयुष्याचा खरा आधार आहे.”


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here