
माणदेश एक्सप्रेस न्यूज | मुंबई :
संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने कहर केला असून, मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र या सर्वच भागांत मुसळधार पाऊस होत आहे. आगामी काही दिवस पाऊस अशीच साथ देणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मात्र मुंबईत तर परिस्थिती आणखीनच गंभीर झाली आहे. शहरातील अनेक भागांत रस्ते पाण्याखाली गेले असून, वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईसह राज्यातील पावसाची सद्यस्थिती स्पष्ट करत नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले.
मुंबईत आठ तासांत 170 मिमी पाऊस
फडणवीस म्हणाले की, मुंबईत गेल्या 48 तासांत जवळपास 200 मिमी पाऊस झाला आहे. विशेष म्हणजे आज सकाळपासून केवळ सहा ते आठ तासांत तब्बल 170 मिमी पाऊस कोसळला. त्यामुळे मुंबईत सर्वत्र पाण्याचा साठा झालेला दिसतोय. चेंबूर परिसरात सर्वाधिक म्हणजेच 177 मिमी पाऊस नोंदवला गेला असून, पूर्व उपनगरात विशेष जोर दिसून येत आहे.
वाहतुकीवर परिणाम, दोन रस्त्यांवर ट्रॅफिक बंद
मुंबईत 14 ठिकाणी पाणी साचले आहे. यापैकी दोन ठिकाणी वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली असून इतर ठिकाणी वाहतूक मंदावली आहे. लोकल रेल्वे पूर्णपणे बंद नाही, परंतु पावसामुळे तिचा वेग मंदावलेला आहे. नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
रेड अलर्ट जाहीर; शाळांना सुट्टी
मुंबईत हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. पुढील 10 ते 12 तास पावसाचा जोर अधिक असणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मंत्रालयातदेखील दुपारी 4 नंतर कर्मचाऱ्यांना घरी जाण्याची परवानगी दिली असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
समुद्राच्या लाटा वाढणार, नागरिकांना इशारा
फडणवीस यांनी सांगितले की, आज संध्याकाळी सहा-साडेसहा वाजल्यानंतर समुद्रात किमान तीन मीटर उंच लाटा उसळतील, तर उद्या या लाटा चार मीटरपर्यंत वाढू शकतात. पावसाचा जोर आणि भरती यामुळे समुद्राची पातळी व नाल्यांची पातळी समान होणार आहे. परिणामी, मोठ्या प्रमाणात पाणी पंपिंग करण्याची गरज भासणार आहे. मुंबई महापालिकेने त्यासाठी तयारी केली असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, या काळात समुद्र किनाऱ्यावर किंवा समुद्राच्या लाटांचा आनंद घेण्यासाठी नागरिकांनी जाणे टाळावे, असे आवाहनही त्यांनी केले.
पुढील निर्णय हवामान खात्याच्या अंदाजावर
फडणवीस म्हणाले की, आज संध्याकाळी डॉप्लर आणि इतर माध्यमांमधून मिळणाऱ्या अंदाजाचा अभ्यास करून उद्या शाळा सुरू ठेवायच्या की नाही याचा निर्णय घेतला जाईल.
👉 थोडक्यात सांगायचं झालं तर मुंबईवर समुद्रातून मोठं संकट येतंय. पुढील 12 तास मुसळधार पाऊस आणि भरतीमुळे परिस्थिती गंभीर होऊ शकते. नागरिकांनी अत्यंत सावधगिरी बाळगून सुरक्षित राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.


