
गेल्या काही महिन्यांपासून भारतीय शेअर बाजारात सतत घसरण होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आजही (२८ फेब्रुवारी) शेअर बाजारात ७०० अंकांपेक्षा जास्त घसरण झाली आहे. सेन्सेक्स सुरुवातीला ५०० अंकांच्या घसरणीसह व्यवहार करत होता. मात्र, नंतर ७०० अंकांपेक्षा जास्त घसरला आहे. याबरोबरच सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांनी घसरण नोंदवली गेली आहे. त्यामुळे भारतीय शेअर बाजाराची मार्चची सुरुवात मोठ्या घसरणीने झाली आहे.
अमेरिकेच्या बाजाराचे परिणाम भारतीय शेअर बाजारात देखील पाहायला मिळाले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ट ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णयाचा धडाका लावला आहे. ट्रम्प यांनी इतर देशांकडून अमेरिकन वस्तूंवर अवलंबल्या जाणाऱ्या टॅरिफ धोरणाविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. आता डोनाल्ट ट्रम्प यांनी २७ फेब्रुवारी रोजी जाहीर केलं की, मेक्सिकन आणि कॅनेडियन वस्तूंवर त्यांचे प्रस्तावित २५ टक्के शुल्क ४ मार्चपासून लागू करण्यात येणार आहे. तसेच चीनी आयातीवर अतिरिक्त १० टक्के शुल्क लागू होईल. या धोरणांचा परिणाम शेअर बाजारात पाहायला मिळत आहे.
दरम्यान, भारतीय शेअर बाजाराची सुरुवात शुक्रवारी अडखळत झाली. त्यानंतर सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांची घसरण झाली. पहाटे २.२७ वाजता सेन्सेक्स ७३० अंकांनी किंवा १ टक्क्यांनी घसरून ७३,८७९ वर तर निफ्टी २१२ अंकांनी किंवा १ टक्क्यांनी घसरून २२,३३२ वर होता. तर निफ्टी ५० निर्देशांक फेब्रुवारीमध्ये आतापर्यंत 4 टक्क्यांहून अधिक घसरला आहे. तसेच बँक निफ्टीही ४०० अंकांच्या घसरणीवर व्यवहार करत होता.