
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : जिल्ह्यातील सर्व औषध विक्री दुकानांमध्ये सी.सी.टी.व्ही. बसवावेत व सांगली जिल्हा नशामुक्त अभियानाला सहकार्य करावे, असे आवाहन प्रभारी सहायक आयुक्त(औषधे)रा.सु.करंडे यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या एनकॉर्ड समितीच्या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी जिल्हा केमिस्ट व ड्रगिस्ट, सांगली यांची बैठक घेऊन औषध दुकानांमध्ये सी.सी.टी.व्ही.बसविण्याबाबत व नशेच्या औषधांच्याबाबत प्रबोधन करण्याच्या सूचना दिल्या होत्या.त्यानुसार अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयात आयोजित जिल्हा केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशनच्या बैठकीत ते बोलत होते.
अन्न व औषध प्रशासन सांगली कार्यालयातील प्रभारी सहायक आयुक्त (औषधे) रा.सु.करंडे, श्रीमती ज.प.सवदत्ती यांनी यावेळी मार्गदर्शन केले.सांगली जिल्ह्यातील अमली पदार्थ तस्करी रोखण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार अनेक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. या अनुषंगाने औषध विक्री दुकानांनीही यामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा. जिल्ह्यातील सर्व औषध दुकानांमध्ये सी.सी.टी.व्ही.बसवावेत तसेच, नशेच्या औषधांचा खरेदी विक्री लेखा अद्ययावत ठेवण्याबाबत सूचना देऊन प्रबोधन करण्यात आले.
जर औषध विक्री दुकानांमध्ये नशेच्या औषधाची अवैध विक्री होताना आढळली तर त्या दुकानावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल.तसेच, त्यांचा परवाना रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.