….तर ठेकेदार आत्महत्या करतील : जयंत पाटील

0
228

माणदेश एक्सप्रेस न्युज
कुंडल : शासन कामांचे ठेके इतक्या चुकीच्या पद्धतीने आणि अंधाधुंद पद्धतीने ठेकेदारांना देत आहे की, आता या ठेक्यांचे पैसे देण्यास शासनाकडे पैसे नाहीत. हे पैसे जर ठेकेदारांना वेळेत दिले नाहीत तर आजवर शेतकऱ्यांच्या आत्महत्या जशा पहायला मिळत होत्या, तशा आता ठेकेदारांच्या आत्महत्या पहायला मिळण्याची शक्यता आहे, असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आम. जयंत पाटील यांनी केले.

 

 

कुंडल (ता. पलूस) येथे मामासाहेब पवार सत्यविजय बँकेचा षष्ट्याब्दीपूर्ती सोहळा, क्रांतिवीर दिवंगत आर. एस. ऊर्फ मामासाहेब पवार यांची ११० व्या जयंती व बँकेच्या नूतन इमारतीचा उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी आमदार विश्वजित कदम, जिल्हा बँकेचे चेअरमन मानसिंग नाईक, जिल्हा बँक संचालक महेंद्र लाड, शरद लाड, प्रतीक पाटील, सुधीर जाधव, दिलीपराव नलावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी भारत नाईक आदी मान्यवर प्रमुख उपस्थित होते.

 

 

 

पुढे बोलताना ते म्हणाले, एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा कसा करावा हे स्व. मामासाहेब पवार यांच्याकडून शिकावे. मामांचे शेतीवर प्रचंड प्रेम होते. ते कधीही घरी सापडायचे नाहीत. ते आपल्या शेतात रमायचे. स्व. राजाराम बापूंना मदत करण्याची भूमिका त्यांनी आयुष्यभर जपली. बाळासाहेबांनीही तो ऋणानुबंध कायम ठेवला. साठ वर्षांपूर्वी उदयास आलेल्या या बँकेत आज पावणे तीनशे कोटींच्या ठेवी आहेत. इतक्या प्रचंड विश्वासावर ही बँक उभी आहे. ठेवीची रक्कम हजार कोटी रुपये होवोत, हीच सदिच्छा. यासाठी सर्व सभासदांनी, कर्मचाऱ्यांनी आणि ठेवीदारांनी पुढाकार घ्यावा. हे गाव क्रांतीकारकांचे आहे. ब्रिटिशांना वाकवण्याचं काम या गावाने केले आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी काम केले. लोकांच्या हक्कांसाठी ते लढले. यापुढेही हे गाव क्रांती करत राहील.

 

 

 

तसेच, जागतिक पातळीवर रुपयाचे अवमूल्यांकन होत असताना आपली प्रगती वाढते आहे की, थांबली आहे, हे पाहावे लागेल. सामान्य नागरिक नेहमी कामात असताना ही आपल्या रुपयाचे अवमूल्यांकन होत असेल तर याला कारणीभूत कोण आणि त्याचा भुर्दंड कोणावर? रुपया घसरणे हे जगाच्या बाजारपेठेत चांगले लक्षण नाही. लाडकी बहीण योजनेतून साडेपाच लाख भगिनींची नावे कमी केली. यासाठी आम्ही आता लाडक्या बहिणींच्या पाठीशी आहोत. किमान अजून कोणाची नावे कमी होऊ देऊ नका कारण त्यांनी मतदान केले आहे. झालेली चूक आता सुधारू नका असेही जयंत पाटील म्हणाले.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here