
फेब्रुवारी महिना उजाडताच प्रेमवीरांना व्हॅलेंटाईन डे ची चाहूल लागलेली असते. ज्यांचं लग्न झालेलं असतं त्यांच्यासाठी हा दिवस खास असतोच.. पण या दिवसाची खरी मजा येते ती नुकत्याच प्रेमात पडलेल्या जोडप्यांना किंवा आपलं प्रेम व्यक्त करण्याची जे संधी शोधत आहेत अशा प्रेमवीरांना.. या दिवशी तुम्ही तुमच्या प्रेमाच्या माणसाला काही भेटवस्तू द्या किंवा नका देऊ पण गुलाबाचं फूल मात्र अवश्य दिलं जातं. कारण गुलाबाशिवाय व्हॅलेंटाईन डे, तुमचं प्रेम असं सगळं अधुरं आहे.. गुलाब हा काही फक्त तुमचं प्रेम व्यक्त करण्याचं एक माध्यमच नाही तर त्याचे कित्येक फायदेही आहेत.
गुलाबाच्या फुलाचे फायदे
१. गावरान गुलाबाचं एखादं रोप तुमच्या बाल्कनीमध्ये असेल तर त्याच्या मंद सुवासाने आपोआपच आजुबाजुचा परिसर सुगंधित होतो. एवढंच नाही तर छान फुललेलं टवटवीत फूल पाहून एकदम फ्रेश वाटतं.
२. अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर केला जातो. काही आजार बरे करण्यासाठी गुलाबाच्या पाकळ्या अतिशय उपयुक्त ठरतात.
३. शरीराला थंडावा देण्यासाठी गुलकंद खाण्याचा सल्ला दिला जातो. यावरून गुलाबाच्या पाकळ्यांचं महत्त्व लक्षात येतं. गुलकंदाचा उपयोग ॲसिडीटी आणि अपचनाचा त्रास कमी करण्यासाठीही होतो.
४. गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये ॲण्टीबॅक्टेरियल घटक असतात. त्यामुळे त्वचेचे वेगवेगळे त्रास कमी करण्यासाठी त्वचेला गुलाबपाणी लावण्याचा सल्ला दिला जातो. गुलाब पाणी त्वचेला व्यवस्थित हायड्रेटेड ठेवते. त्वचेची चमक आणि तारुण्य टिकवून ठेवण्यासाठी गुलाबपाण्याचा उपयाेग होतो.
५. मानसिक तणाव कमी करण्यासाठी गुलाबाच्या पाकळ्यांचा काढा पिण्याचा सल्ला दिला जातो. गुलाबाचा काढा प्यायल्यामुळे चांगली झोपही लागते. शिवाय घसा दुखत असेल, खोकल्याचा त्रास असेल तर तो त्रास कमी करण्यासाठीही गुलाबाचा काढा पिण्याचा सल्ला दिला जातो.
६. रक्तदाब नियंत्रित ठेवून हृदयाचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठीही गुलाबामध्ये असणारे काही घटक उपयुक्त ठरतात.