
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : जागेचा वाद व यू-ट्यूब चॅनेलवर बातमी लावल्याचा राग मनात धरून पत्रकार प्रसाद प्रकाश पिसाळ (वय ३३, रा. खानापूर रोड, विटा) यांच्यावर कोयत्यासारख्या धारदार हत्यार आणि स्टीलच्या रॉडने प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात पिसाळ हे गंभीर जखमी झाले आहे.
ही घटना मंगळवारी रात्री पावणे आठ वाजण्याच्या सुमारास मायणी रस्त्यावरील न्यूज चॅनेलच्या कार्यालयात घडली. याप्रकरणी राहुल जाधव, सागर भानुदास चोथे, विनोद सावंत (सर्व रा. विटा) व सुनील पवार (रा. लेंगरे) या चौघांविरुद्ध विटा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
विटा येथील पत्रकार प्रसाद पिसाळ यांचे मायणी रस्त्यावर न्यूज चॅनेलचे कार्यालय आहे. या कार्यालयात मंगळवारी रात्री पिसाळ व सहाय्यक महिला कर्मचारी सुषमा जोशी हे कामकाज करीत असताना सागर चोथे व विनोद सावंत यांच्या सांगण्यावरून राहुल जाधव व सुनील पवार हे दोघेजण कार्यालयात घुसले. त्यावेळी राहुल जाधव याने हातातील कोयत्यासारख्या धारदार हत्याराने तर सुनील पवार याने स्टीलच्या रॉडने पिसाळ यांच्या हातावर, पायावर, डोक्यावर व पाठीवर हल्ला चढविला.
यावेळी महिला कर्मचारी जोशी सोडविण्यासाठी आल्या असताना त्यांनाही मारहाण करण्यात आली. यात पिसाळ हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर विट्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी प्रसाद पिसाळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विटा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित राहुल जाधव व सुनील पवार या दोघांना अटक केली असून सागर चोथे व विनोद सावंत या दोघांचा पोलिस शोध घेत आहेत.