‘माणगंगा’ सहकारी राहणार आणि चालू करणार अमरसिंह देशमुख : आम. गोपीचंद पडळकरांच्या आरोपांचे खंडन

0
904

सहकार तत्त्वावर विकत घेणार- अमरसिंह देशमुख
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी येथील माणगंगा सहकारी साखर कारखाना हा सहकारी तत्वावर घेवून तो चालू करणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी पत्रकार परिषदेत केले. तसेच आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेले सर्व आरोप खुडून काढत त्यांचे खंडन केले.

 

आटपाडी येथे आमदार गोपीचंद पडळकर यांनी माणगंगा साखर कारखाना बाबत भूमिका स्पष्ट करण्यासाठी बैठक घेतली होती. या बैठकीत त्यांनी अनेक मुद्दे मांडत नाव न घेता अमरसिंह देशमुख यांच्यावर टीका केली होती. याबाबत पत्रकार परिषद घेत अमरसिंह देशमुख यांनी भूमिका स्पष्ट केली.

 

आटपाडी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने माणगंगा कारखाना सुरु होणे काळाची गरज आहे. परंतु सदर कारखाना हा जिल्हा बँकेच्या ताब्यात आहे. बँकेने असणाऱ्या कर्जापोटी साखर कारखान्याची मालमत्ता विकत घेतली आहे. त्यामुळे कारखान्यांच्या संस्थेच्या असणाऱ्या सभासदांची मालकी संपुष्टात आली आहे. बँकेने दोन वर्षांपूर्वी कारखाना चालवण्यास दिला होता. मात्र त्या संस्थेकडून कारखाना चालवला गेला नाही. आता पुन्हा नव्याने लिलाव प्रक्रिया सुरू होणार आहे. यामध्ये बँकेचे मोर्जेग व नॉन मोर्जेग असे साधारणत २५० ते ३०० कोटी रुपयांचे कर्जे आहे.

 

डोक्याने विचार केल्यास नको, मनातून केल्यावर पाहिजे!

माणगंगा कारखाना चालू करण्यासाठी मोर्जेग व नॉन मोर्जेग अशी एकूण २५० ते ३०० कोटी रुपयांची कर्जे आहेत. नवीन कारखाना चालू करण्यासाठी साधारतपणे १०० ते १२५ कोटी रुपयात चालू करता येतो. त्यामुळे डोक्याने विचार केला तर कारखाना विकत घेवून चालवायला नको असे वाटते. पण मनातून विचार केल्यास तो चालू केला पाहिजे वाटते. त्यामुळे कारखाना चालू करणार असल्याचे अमरसिंह देशमुख म्हणाले.

 

फडणवीस साहेबांची मदत

माणगंगा साखर कारखाना चालू करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची भेट घेतली आहेत. यामध्ये फडणवीस साहेबांनी साखर कारखाना चालू करण्यासाठी मदत करणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे कारखाना चालू करण्यासाठी भविष्यात भाजपची मदत होणार आहे.

 

कारखाना अडचणीत असताना चालविला

माणगंगा कारखाना परिसरात ऊस नसताना, तो चालविला जात होता. त्यावेळेस देखील कारखान्याचे कर्ज थकीत जात असलेतरी ती कर्जे पुन्हा फिरवून दिली जात होती. परंतु आता मात्र कारखाना परिसरात ऊसाची उपलब्धता मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळे कारखाना चालू होणे अपेक्षित असताना तो बँकेचे ताब्यात घेतल्याने यांमध्ये शंका येत आहे.

 

जमीन विक्री कशी होणार

माणगंगा साखर कारखाना खाजगी करून त्याची जमीन विक्री करण्याचा डाव असल्याचे आम. पडळकर म्हणाले होते. यावर बोलताना अमरसिंह देशमुख म्हणाले, कारखाना परिसरात मोठ्या प्रमाणात मळी व कारखाना सांडपाणी साचत असल्याने या ठिकाणी राहण्यासाठी जमीन लायक नाही. त्यामुळे येथील जमीन विक्री करण्याचा प्रश्नच येत नाही. केवळ राजकीय टीका यापेक्षा वेगळे यामध्ये काही नाही.

 

 

आम. पडळकर हलक्या कानाचे

आमदार गोपीचंद पडळकर व आम्ही मागील जिल्हा परिषद, पंचायत समितीपासून ते बाजार समिती पर्यंत एकत्र आहोत. या निवडणुका आम्ही एकत्र येवून लढविल्या असून यामध्ये आम्हाला यश आले आहे. परंतु काहींनी पडळकर यांचे कान भरण्याचे प्रयत्न केले आहेत. सध्या कान भरणारी माणसे त्यांच्यापासून लांब जात असल्याने, आम्ही आमच्या बाजूने होणाऱ्या टीकेला प्रत्युत्तर देणार नाही. कारण दोनही बाजूंनी ताणण्यात उपयोग नसल्याचे अमरसिंह देशमुख म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here