![GBS](https://mandeshexpress.com/wp-content/uploads/2025/01/GBS.png)
माणदेश एक्सप्रेस/पुणे : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून गुईलेन बॅरे सिंड्रोम अर्थात जीबीएस या आजाराचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. सुरुवातीला पुणे आणि परिसरात या आजाराचे रुग्ण आढळल्यानंतर आता राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही संशयित रुग्ण आढळून येत आहेत. जीबीएसच्या संशयित रुग्णांचा आकडा १७० वर पोहोचला असून १३२ जणांना हा आजार झाल्याचे निष्पण्ण झाले आहे. तसंच आतापर्यंत ५ जणांनी आपले प्राण गमावले आहेत.
दरम्यान, आतापर्यंत जीबीएसच्या ६२ रुग्णांवर उपचार करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसंच ६१ जणांवर आयसीयूमध्ये तर २० जणांवर व्हेंटिलेटरवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
जीबीएस आजाराची सर्वसाधारण लक्षणे :
– अचानक पायातील किंवा हातात येणारी कमजोरी किंवा लकवा
– अचानकपणे उद्भवलेला चालण्यातील त्रास किंवा कमजोरी
– जास्त दिवसांचा डायरिया
दरम्यान, अशा प्रकारचे लक्षणे जाणवल्यास नागरिकांनी घाबरून न जाता सरकारी रुग्णालयात तपासणी करून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात, असं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलं आहे.
जीबीएस विषाणुपासून बचावाच्या उपाययोजना :
– पाण्याचा दर्जा चांगला ठेवण्यासाठी पिण्याचे पाणी उकळून प्यावे.
– ताजे आणि स्वच्छ अन्न पदार्थांचे सेवन करावे. संसर्ग टाळण्यासाठी शिजवलेले आणि न शिजवलेले अन्नपदार्थ एकत्र ठेवू नये.
– वैयक्तिक स्वच्छतेवर भर देण्यात यावा.