माणदेश एक्सप्रेस/नाशिक : नाशिकसह राज्यात शिंदे सेनेत गटबाजीचा कोणताही विषय नाही. आम्ही एकसंघ आहोत. राज्यभर दौरा करीत असताना पक्षात येण्यासाठी अनेक जण इच्छुक असल्याचे लक्षात आले. नाशिकमध्येही यादी मोठी आहे. इतर पक्षातील अनेक दिग्गज शिंदे सेनेत येण्यासाठी रांगेत आहेत, असे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
उद्धव सेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टिकेबाबत दादा भुसे यांना विचारले असता राऊत यांना काही काम उरले नाही. चांगल्या ठिकाणी राऊत यांचे नाव नको, अशी टीकाही दादा भुसे यांनी केली. पक्षाची बैठक सोमवारी (दि. ३) झाली. त्यानंतर भुसे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
दादा भुसे यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यव्यापी दौरा करीत असून, नाशिक विभागात ते १३ फेब्रुवारीला येत आहेत. तसेच, नाशिकमध्ये पक्षात गटबाजीचे दर्शन घडत असल्याचा दादा भुसे यांनी इन्कार केला. ते म्हणाले, गटबाजीचा विषय नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि धनुष्यबाण हाच आमचा गट आहे.