भारतीय संघाला इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामुळे भारतीय संघानं विजय हॅटट्रिकसह मालिका खिशात घालण्याची संधी गमावली. एवढेच नाही तर इंग्लंड संघाच्या मालिका विजयाच्या आशाही पल्लवित झाल्या आहेत. वरुण चक्रवर्तीच्या फर्स्ट क्लास कामगिरीनंतर फलंदाजांनी नांगी टाकल्यामुळे भारतीय संघावर पराभवाची नामुष्की ओढावली. या पराभवानंतर टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवनं एका बाजूला इंग्लंडच्या ताफ्यातील एक विकेट घेणाऱ्या आदिल रशीदच कौतुक केले तर दुसऱ्या बाजूला मोहम्मद शमीच्या कामगिरीवरही नाराजी व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले.
मॅचनंतर सूर्यकुमार यादव म्हणाला की, दुसऱ्या इनिंगमध्ये बॅटिंग करताना दव फॅक्टर प्रभावी ठरला, असं वाटते. हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेल जोपर्यंत मैदानात होते तोपर्यंत सामना आमच्या हातात होता. पण आदिल रशीदनं सर्वोत्तम गोलंदाजी केली. त्याने स्ट्राइक रोटेड करू दिले नाही. त्यामुळे सामना फिरला. इंग्लंडच्या विजयाचं श्रेय आदिल रशीदला जाते, असे सूर्यकुमार यादवनं म्हटलं आहे.
मोहम्मद शमीच्या कामगिरीवर सूर्यकुमार यादव नाखुश दिसला. वनडे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या अनुभवी गोलंदाजाने ३ षटकांत २५ धावा खर्च केल्या.त्याच्या कामगिरीवर प्रतिक्रिया देताना भारतीय कॅप्टन म्हणाला की, आगामी सामन्यात तो कामगिरीत सुधारणा करेल, अशी अपेक्षा आहे. त्यानं कमबॅक करणाऱ्या गोलंदाजावर थेट नाराजी व्यक्त केली नसली तरी सूर्यकुमार यादवनं बोलून दाखवलेली भावना ही कॅप्टन शमीच्या कामगिरीवर नाखुश असल्याचा सीन दाखवणारी होती. दुसऱ्या बाजूला त्याने वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीला दाद दिल्याचे पाहायला मिळाले.
वरुण चक्रवर्ती सराव सत्रांमध्ये खूप मेहनत घेत आहे. तो शिस्तबद्ध आहे आणि त्याला मेहनतीचे फळ मिळत आहे, अशा शब्दांत भारतीय टी-२० संघाच्या कर्णधारानं मिस्ट्री स्पिनरवर स्तुती सुमनांचा वर्षाव केला. टी-२० सामन्यातून नेहमीच काहीतरी शिकायला मिळते. फलंदाजीत झालेल्या चुका सुधारून पुन्हा आत्मविश्वासानं मैदानात उतरू, असेही सूर्यकुमार यादव मालिकेतील पहिल्या पराभवानंतर म्हणाला आहे.