माणदेश एक्सप्रेस/मुंबई : महायुती सत्तेत आल्यास शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीपूर्वी दिले होते. पण सत्ता स्थापन होताच राज्याचे अर्थमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार मात्र मी कधीच कर्जमाफी देईल, असे कधी बोललोच नसल्याचे सांगितले. “माझ्या भाषणात तुम्ही कधी कर्जमाफीबद्दल ऐकले का?” असे विधान अजित पवार यांनी केले होते. या विधानावर बोलत असताना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी शेतकरीच मूर्ख असल्याचे संबोधले आहे.
अमरावती येथे पत्रकारांशी बोलत असताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, या सरकारने, आधीच्या सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी, व्याज माफीचे आश्वासने दिली होती. साता बारा कोरा करण्याची भाषा वापरली गेली. मी शेतकऱ्यांना मूर्ख यासाठी म्हणतो, कारण त्यांनी सत्तेवर पुन्हा कुणाला बसवले? मग आता पुन्हा रडत बसण्याचे कारण काय? शेतामध्ये जे पेरता तेच उगवते, तसेच कर्ज माफी करणार नाही, असे म्हणणारे सरकार तुम्ही निवडून दिले. ते आता कर्जमाफी देणार नसतील तर त्यात नवीन काय?
निसर्गाच्या नियमाच्या विरोधात जर शेतकरी वागणार असतील तर ते भोगावे लागणारच. शेतकऱ्यांनी या गोष्टीचा विचार केला पाहीजे. मी सत्य बोलल्यामुळे लोक मला शिव्या घालतील. त्याची मला अजिबात पर्वा नाही, असेही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.