![HMPV](https://mandeshexpress.com/wp-content/uploads/2025/01/HMPV-696x558.jpg)
नागपूर: बंगळुरूमध्ये भारतातील पहिल्या ‘ह्युमन मेटान्युमोव्हायरस (एचएमपीव्ही) रुग्णाची नोंद झाल्यानंतर मंगळवारी नागपुरातही दोन रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी या संदर्भात पत्रपरिषद घेऊन ही माहिती दिली. अधिक तपासणीसाठी रुग्णाचे नमुने अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) व पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेत (एनआयव्ही) पाठविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
नागपुरामध्ये रहिवासी असलेली १७ वर्षांची मुलगी व ७ वर्षाच्या मुलाला मागील काही दिवसांपासून सर्दी, खोकला व ताप असल्याने रामदासपेठ येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचाराला आले. औषधी देऊनही आजार बरा होत नसल्याने रुग्णाचे नमुने नीरीच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले असता दोघेही ‘एचएमपीव्ही’ बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला.
या विषयी अधिक माहिती देताना जिल्हाधिकारी डॉ. इटनकर म्हणाले, घाबरण्याचे कारण नाही. दोन्ही मुलांच्या नमुन्यांचे जिनोम सिक्वेन्सिंग करण्यासाठी नमुने ‘एम्स’मध्ये पाठविण्यात आले आहे. तसेच विषाणूच्या सखोल माहितीसाठी पुण्याच्या ‘एनआयव्ही’ प्रयोगशाळेत नमुने पाठविण्यात आले आहे.