बीड : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची डिसेंबर महिन्यात अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. या प्रकरणाचे पडसाद राज्यात उमटले, तसंच हिवाळी अधिवेशनातही उमटले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत निवेदन द्यावं लागलं. यानंतर सुरेश धस यांनी या प्रकरणात न्याय मिळावा ही मागणी सातत्याने लावून धरली आहे. दरम्यान आज सुरेश धस यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी राज्यपालांना भेटून धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा ही मागणी केली. संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुरुवातीला तीन आरोपींना अटक केली. त्यानंतर वाल्मिक कराड ३१ डिसेंबरला शरण आला. आता वाल्मिक कराड हाच या प्रकरणाचा मास्टर माईंड आहे असा आरोप केला जातो आहे.
संभाजीराजे छत्रपती, विजय वडेट्टीवार, मी आम्ही सर्वपक्षीय लोक राज्यपालांना भेटलो. धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा किंवा त्यांना बिनखात्याचं मंत्री करावं ही मागणी आम्ही केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही आम्ही या प्रकरणात भेट घेणार आहोत. देवेंद्र फडणवीस यांना सगळी वस्तुस्थिती माहीत आहे. कारण देवेंद्र फडणवीस हे गृहखात्याचे प्रमुख आहे तसंच राज्याचे प्रमुख आहेत असं सुरेश धस यांनी म्हटलं आहे.
छगन भुजबळ यांनी बाळासाहेब ठाकरेंसह काम केलं आहे, शरद पवारांबरोबर काम केलं आहे. छगन भुजबळ मुरब्बी राजकारणी आहेत. तुम्ही छगन भुजबळ यांनी जी भूमिका मांडली की राजीनामा घ्यायला नको त्यात त्यांना काय म्हणायचं आहे ते ओळखून घ्या. ते नाही म्हणाले म्हणजे त्यात काय आहे ते ओळखून घ्या असंही सुरेश धस म्हणाले. वंजारी समाज किंवा मराठा समाज असा वाद नाही. वंजारी समाजाच्या लोकांना जे काही झालं आहे ते पटलं नाही. वाल्मिक अण्णाच्या गँगचा त्रास वंजारी समाजालाही झाला आहे. सुदर्शन घुले हा त्या प्रकरणातलाही आरोपी आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी जे सांगितलं आहे त्यानंतर मी त्यांच्या पुढे जाणार नाही. मात्र संतोष देशमुख यांची हत्या प्रकरणात जे काही घडलं आहे, जशी हत्या झाली आहे त्यामुळे मी दुखावलो आहे. संतोष देशमुख यांच्या खुन्यांना शिक्षा झाली पाहिजे ही आमची मागणी आहे. संतोष देशमुख प्रकरणातले आरोपी बिक्कडने पळवले आहे. वाल्मिक कराड, बिक्कड कुठे कुठे एकत्र होते याचा तपास समोर येईल.