काय सांगतो अक्षय शिंदेचा पोस्टमार्टम रिपोर्ट?डोक्यात गोळी लागल्याने…

0
834

 

अक्षय शिंदे (Akshay Shinde) यांचा मृत्यू अति रक्तस्त्रावामुळे झाल्याचं शवविच्छेदन अहवालातून (Postmortem Report) समोर आलं आहे. अक्षय शिंदेच्या डोक्याला एक गोळी लागल्याचं शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आलं आहे. हा शवविच्छेदन अहवाल मुंब्रा पोलिसांकडे (Mumbra Police) सुपूर्द करण्यात आला आहे. जेजे रुग्णालयात (JJ Hospital) सात तास सुरू असलेल्या शवविच्छेदन प्रकियेची व्हिडीओग्राफी देखील करण्यात आली आहे. जेजे रुग्णालयाच्या पाच डॉक्टरांच्या पॅनलनं अक्षय शिंदेचं शवविच्छेदन केलं आहे.

पोलीस चकमकीत ठार झालेला बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या डोक्यात गोळी लागल्यानं अतिरक्तस्त्राव झाल्यानं त्याचा मृत्यू झाला. अक्षयच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये ही बाब समोर आली आहे. महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील प्रसिद्ध बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला सोमवारी नवी मुंबईच्या तळोजा कारागृहातून महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील बदलापूरला नेत असताना पोलिसांनी चकमकीत ठार केलं.

अति रक्तस्रावामुळे अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्याचं रुग्णालयातील सूत्रांनी सांगितलं. प्राथमिक शवविच्छेदन अहवालात अक्षयच्या डोक्यात गोळी लागल्याचं स्पष्ट झालं आहे. गोळी लागल्यानं अति रक्तस्राव झाल्यामुळे अक्षय शिंदेचा तात्काळ मृत्यू झाल्याचं अहवालातून समोर आलं आहे.

सात तास चाललं पोस्टमार्टम
आरोपीचा प्राथमिक शवविच्छेदन अहवाल मुंब्रा पोलिसांकडे सोपवण्यात आला आहे. अक्षय शिंदेचं मंगळवारी पोस्टमार्टम करण्यात आलं, जे सुमारे सात तास चाललं आणि त्याची व्हिडीओग्राफीही करण्यात आली आहे. पाच डॉक्टरांच्या समितीनं अक्षय शिंदेचं शवविच्छेदन केलं. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचं शवविच्छेदन करून ठाणे पोलीस रवाना झाले. मात्र आश्चर्यकारक बाब म्हणजे, त्याचा मृतदेह अद्याप कुटुंबियांकडे सोपवण्यात आलेला नाही. अक्षय शिंदेचा मृतदेह कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या शवागृहात ठेवण्यात येणार आहे.

अक्षय शिंदेच्या वडिलांचे गंभीर आरोप
बदलापूर प्रकरणातील पुरावे नष्ट करण्यासाठीच अक्षय शिंदेची हत्या केल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे. याप्रकरणी अक्षय शिंदेच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणी आज तातडीची सुनावणी होणार आहे.या प्रकरणातील मूळ आरोपींना वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काउंटर केला असल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे. या कथित चकमकीबाबतचे पुरावेही नष्ट करण्याची भीती अक्षयचे वडील अण्णा शिंदे यांनी याचिकेतून व्यक्त केली आहे.

संजय राऊतांचे गंभीर आरोप, रोख नेमका कुणाकडे?
बदलापूर अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय़ शिंदेच्या एन्काऊंटरनंतर संजय राऊतांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. कुणालातरी वाचवण्यासाठी हे सगळं झालं का? अशी शंका राऊतांनी व्यक्त केली आहे. संस्थाचालक दोषी नसेल तर सीसीटीव्ही फुटेज गायब का केलं? असा सवाल राऊतांनी विचारला आहे. महाराष्ट्राची जनता येत्या निवडणुकीत दुसऱ्या शिंदेंचा राजकीय एन्काऊंटर करेल, अशी टीकाही संजय राऊतांनी मुख्यमंत्री शिंदेंवर केली आहे. राऊतांच्या टीकेला शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार भरत गोगावलेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.