लोकसभा निवडणुकीचा सहावा टप्पा आता २५ मे रोजी होणार आहे. या निवडणुकीतील महाराष्ट्रातील पाचही टप्पे पूर्ण झाले आहेत. यामुळे आपल्या मतदार संघात कोण निवडणूक जिंकणार? यावरुन चर्चा रंगू लागल्या आहेत. अनेक जण हाच उमेदवार जिंकणार? असा दावा करत पैज लावत आहेत. या सर्व चर्चा ४ जूनपर्यंत सुरु राहणार आहे. परंतु या चर्चेतून निर्माण झालेल्या वादात हाणामारी झाली. या हाणामारीत एकाचा मृत्यू झाल्याची घटना विदर्भातील रामटेक लोकसभा मतदार संघात घडली. या प्रकरणात एकाला अटक करण्यात आली आहे. हाणामारीत सतीश फुले तरुणाचा मृत्यू झाला आहे.
रामटेक लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी मतदान झाले. या मतदार संघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजू पारवे आणि काँग्रेसचे श्याम कुमार बर्वे हे रिंगणात आहेत. या मतदार संघातील नरखेड तालुक्यातील सिंगारखेडा गावात निवडणूक कोण जिंकणार? यावरुन गावातील तरुणांमध्ये चर्चा सुरु होती. लोकसभेच्या निवडणुकीत कोण जिंकणार चर्चेतून वाद झाला. वादानंतर हाणामारी झाली. त्यानंतर एकाने प्राण गमवला आहे.
रामटेक लोकसभा मतदार संघात असणाऱ्या सिंगारखेडा गावातील पारावर तरुणांमध्ये चर्चा सुरु होती. लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार यावर चर्चा सुरू असताना वाद निर्माण झाला. वादाची ठिणगी पडली आणि वाद वाढून हाणामारीमध्ये बदलला. या हाणामारीत सतीश फुले तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणात आरोपी प्रवीण बोरडे याला पोलिसांनी सावरगावमधून ताब्यात घेतले आहे.