फोटोग्राफर्स, पापाराझी यांना पाहून का चिडतात जया बच्चन? पापाराझीने सांगितलं खरं कारण

0
186

ज्येष्ठ अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन या नेहमीच त्यांच्या तापट स्वभावासाठी ओळखल्या जातात. त्यांना कॅमेरा आणि मीडिया यांच्याविषयी फार प्रेम नसल्याचं अनेकदा पहायला मिळतं. त्यांच्यासमोर जेव्हा कधी पापाराझी किंवा फोटोग्राफर्स जातात, तेव्हा त्या नेहमीच चिडलेल्या दिसतात. अनेकदा त्यांना फोटोग्राफर्सवर ओरडतानाही पाहिलं गेलंय. अशा लोकांना नोकरीवरून काढा, असंही त्या एकदा पापाराझींसमोर म्हणाल्या होत्या. त्यामुळे त्यांचा चिडका स्वभाव पाहून फोटोग्राफर्स आणि पापाराझी त्यांच्यापासून चार हात लांबच राहतात. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पापाराझो मानव मंगलानी याने जया बच्चन यांच्या चिडण्यामागचं कारण सांगितलं आहे.

अलीना डिसेक्ट्सला दिलेल्या मुलाखतीत मानवने स्पष्ट केलं की जया बच्चन यांना मीडियाची इतकी सवय नाही. “त्यांना मीडियासमोर वावरण्याची इतकी सवय नाही. त्यांच्या काळी माध्यमांचे मोजकेच लोक असायचे. ते आरामात फोटोग्राफी वगैरे करायचे. आता मीडियाचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. जेव्हा त्या पत्रकार परिषदेत किंवा चित्रपटाच्या प्रीमिअरला असतात, तेव्हा त्यांना कोणतीच समस्या नसते. पण जेव्हा त्या कोणत्याच तयारीत नसतात, तेव्हा त्या चिडतात. आम्ही तर फक्त डिनरला गेलो, इथे इतकी लोकं कशी जमली, असा प्रश्न त्यांना पडतो”, असं त्याने सांगितलं.

यावेळी मानवने जया बच्चन यांच्या स्वभावाची चांगली बाजूही सांगितली. “त्या कधी कधी आमच्यासोबत मस्करीही करतात. कोणत्या अँगलने फोटो घ्यायचे, याविषयीही त्या सांगतात. हे खाली कुठे फोटो घेताय, या अँगलने घ्या, असं त्या म्हणतात. त्यांनी मीडियाची सवय नाही. त्यांच्याकाळी फक्त मोजक्या चॅनलचे चार-पाच लोक असायचे. जया बच्चन यांचा स्वत:चा एक वेगळा फंडा आहे”, असं तो पुढे म्हणाला.

लग्नानंतर सासरी जेवण बनवण्यासाठी दबाव? सोनाक्षी सिन्हाने केला खुलासा..
जया बच्चन यांच्या तापट स्वभावावरून एकदा अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांनी मस्करी केली होती. एका कार्यक्रमात पापाराझी त्यांना फोटो क्लिक करताना “उजवीकडे पहा, डावीकडे पहा” अशा सूचना देत होते, तेव्हा मौसमी चॅटर्जी थोड्या वैतागल्या होत्या. मात्र फोटोग्राफर्ससमोर त्यांनी संयमाने पोझ दिले. यावेळी एका मैत्रिणीने जेव्हा त्यांची तुलना अभिनेत्री जया बच्चन यांच्याशी केली, तेव्हा त्या लगेच पापाराझींकडे बघत म्हणाल्या होत्या, “मी जया बच्चन यांच्यापेक्षा चांगली व्यक्ती आहे.”