‘या’ राज्यातून धावणार देशातील पहिली वंदे भारत मेट्रो, तिकीट फक्त 30 रुपयांपासून सुरु

0
671

देशातील रेल्वे नेटवर्कला आधुनिक बनवण्यासाठी आणि प्रवाशांना आरामदायी प्रवासाची सेवा देण्यासाठी वंदे भारत एक्स्प्रेस सुरु करण्यात आल्या आहेत. आता पहिली वंदे भारत मेट्रो ट्रेन सुरु होणार आहे. रेल्वे मंत्रालयानं यासंदर्भातील वेळापत्रक जारी केलं आहे. पहिली वंदे भारत मेट्रो ट्रेन भुज ते अहमदाबाद दरम्यान धावेल. ही रेल्वे आठवड्यातून 6 दिवस चालणार आहे. भुजमध्ये रविवारी तर अहमदाबादकडून शनिवारी ही सेवा बंद राहील.

देशातील पहिली वंदे भारत मेट्रो गुजरातच्या भुज पासून अहमदाबादपर्यंत चालवली जाणार आहे. या मध्ये अंजार, गाधीधाम, भचाऊ, समखियाली, हलवद, ध्रांगध्रा, विरमगाम, चांदलोडिया आणि साबरमतीला थांबेल. अहमदाबादहून निघालेली वंदे भारत मेट्रो साबरमती, चांदलोडिया, विरमगाम, ध्रांगध्रा, हलवद, समखियाली, भचाऊ, गांधीधाम अंजार मार्गे भुजला पोहोचेल.

वंदे भारत मेट्रोचं वेळापत्रक
वंदे भारत मेट्रो ट्रेन सकाळी 5.05 वाजता भुजहून रवाना होईल, अहमदाबादला सकाळी 10.50 ला पोहोचेल. त्यानंतर सायंकाळी 05.30 वाजता सुटेल ती भुजला रात्री 11.10 वाजता पोहोचेल. वंदे भारत मेट्रो ट्रेन 9 स्थानकावर थांबेल. प्रत्येक स्थानकांवर वंदे भारत मेट्रो 2 मिनिटं असेल. या ट्रेनला दोन्ही शहरांना जोडण्यास पावणे सहा तासांचा वेळ लागेल.

वंदे भारत एक्स्प्रेसचं दरपत्रक देखील जारी करण्यात आलं आहे. या मेट्रो ट्रेनच्या तिकिटाचा कमीत कमी दर 30 रुपये असेल, यावर जीएसटी देखील लागेल. 50 किलोमीटरच्या प्रवासाला 60 रुपये अधिक इतकं शुल्क लागेल. म्हणजेच एका किलोमीटरला 1.20 रुपये लागतील.

वंदे भारत मेट्रो ट्रेनमध्ये एमएसटी म्हणजेच मासिक पास वैध असेल. मात्र, साधारण मेल आणि एक्स्प्रेस ट्रेन किंवा पॅसेंजर ट्रेनसाठी जारी केलेलं एमएसटी तिकीट चालणार नाही. यासाठी वेगळं एमएसटी तिकीट जारी केलं जाईल. साप्ताहिक, मासिक तिकीट उपलब्ध असेल. प्रवाशांना सात दिवस, 15 दिवस, 20 दिवसांच्या एकेरी प्रवासाचं शुल्क भरावं लागेल.

रेल्वे मंत्रालयाच्या माहितीनुसार ही ट्रेन आठवड्यातून सहा दिवस सुरु राहील.एक दिवस ही ट्रेन सुरु राहणार नाही. वंदे भारत मेट्रो ट्रेनचे रेक रेल्वे मंत्रालयाच्या चेन्नईयेथील आयसीएफमध्ये बनवले आहेत. वंदे भारत मेट्रो ट्रेनची निर्मिती 200 किलोमीटर प्रति तास वेगानं धावेल, अशा प्रकारे करण्यात आलेली आहे. भुज-अहमदाबाद मार्गावर मेट्रोचा वेग 100 ते 150 किमी प्रति तास असेल. वंदे भारत मेट्रोमध्ये स्वयंचलित दरवाजे आहेत. यामुळं प्रवासी दारात उभे राहू शकत नाहीत.