मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात मराठा समाजाचे नेते आक्रमक झाले आहे. आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी सरकारच्या नाकात दम आणला असताना मनोज जरांगे यांच्यासमोर अडचण उभी केली गेली आहे. सोलापूरमधील बार्शीतील एका मराठा नेत्याने आठ दिवसांपूर्वी मनोज जरांगे यांना काही प्रश्न विचारले होते. या प्रश्नांची उत्तरे आठ दिवसांत न दिल्यास ९ सप्टेंबरपासून मनोज जरांगे विरोधात ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही दिला होता. मनोज जरांगे यांनी या प्रश्नांची उत्तरे दिली नाही. यामुळे बार्शीतील मराठा समाजाचे कार्यकर्ते अण्णासाहेब शिंदे यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
काय म्हणाले अण्णासाहेब शिंदे
आंदोलनात बोलताना अण्णासाहेब शिंदे म्हणाले की, मी मनोज जरांगे यांना प्रश्न विचारले पण त्यांनी उत्तरे दिले नाहीत . मी प्रश्न विचारले ही चूक झाली का? मराठा आरक्षणाला खुट्टा शरद पवार यांनीच मारला. पण तुमच्या डोक्यात काही तरी हवा शिरली आहे. एकनाथ शिंदे सारखा मराठा मुख्यमंत्री लाभला आहे, तो कुणबी प्रमाणपत्र मिळावे म्हणून रात्रदिन राबला आहे. राजेंद्र राऊत सारख्या माणसाचा विरोधात तुम्ही बोलला, त्यांच्या कुटुंबातील लोकविषयीं बोललात. बार्शी तालुक्याला सांभाळणारा ढाण्या वाघ राजेंद्र राऊत आहे, त्यांना सांभाळणारी रणरागिणी ही आमची माऊली आहे. त्यांच्या विषयी बोललात तर याद राखा, तुम्हाला बोलायला तोंड असेल तर आमच्याकडे ही तोंड आहे. एक महिन्याची मुदत मला द्या, आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावून दाखवतो. मराठा आरक्षण समन्वयक समिती करून आपण काम करू. मी समाजाचा मालक नाही, प्रत्येकाला प्रश्न विचारण्याचा अधिकार राहील, असे अण्णासाहेब शिंदे यांनी सांगितले.
हजारो जणांच्या उपस्थितीत आंदोलन
मनोज जरांगे यांना विचारलेल्या अकरा प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिली नाही. यामुळे अण्णासाहेब शिंदे आक्रमक झाले आहेत. अण्णासाहेब शिंदे आपल्या हजारो मराठा कार्यकर्त्यांसह ठिय्या आंदोलनाला बसले आहे. बार्शी शहरातील नगरपरिषदेसमोर असलेल्या शिवसृष्टी येथे आंदोलन सुरू केले आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्यांच्या जाहीरनाम्यात मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याबाबत आश्वासन देण्यासाठी सांगणार का? यासह अकरा प्रश्न अण्णासाहेब शिंदे यांनी विचारले आहे.
अण्णासाहेब शिंदे यांनी विचारली ही प्रश्न
आदरणीय मनोज (दादा) जरांगे पाटील आमच्या शंका दूर करतील का? या शीर्षकाखाली अण्णासाहेब शिंदे यांनी अकरा प्रश्न विचारले आहेत. त्यातील काही प्रश्न…
महायुतीचे सरकार ओबीसीतून आरक्षण देऊ शकत नाही. म्हणून दादा आपण महायुतीच्या विरोधात भूमिका घेतली.
लोकसभा निवडणुकीत आपण महाविकास आघाडीचे खासदार निवडूनही आणले, त्यांनी एकदाही निवडून आल्याची जाणीव ठेवली नाही. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या आपल्या मागणीला त्यांनी पाठिंबा दिलेला नाही.
मनोजदादा आताही आपण महायुतीच्या विरोधात भूमिका घेतली आहे. दादा आपल्या भूमिकेमुळे गरजवंत मराठा समाज महाविकास आघाडीला मतदान करेल यात शंका नाही.
मग दादा आपण भूमिका घेतली, तर ती महायुतीच्या विरोधात विरोधात असणार आणि महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येणार हे मान्य आहे.दादा, विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी किती दिवसात गरजवंत मराठ्यांना ओबीसी आरक्षण देणार आहे, ते लिहून घ्यावे.दादा पूर्वी मुस्लिम-मराठा वाद रझाकाराच्या काळात झाला, त्यानंतर मराठा-दलित वाद झाला. आता मराठ्यांचे ३०० हून अधिक ओबीसी बरोबर वैमनस्य झाले. आपण आणखी किती जातींबरोबर वैर घ्यायचे, हेही ठरवा.
दादा आपण एका देवेंद्र फडणवीस ब्राह्मण समाजाच्या व्यक्तीला हटवणार आणि मराठ्यांचे असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात असलेले महायुतीचे सरकार घालवून एक मराठा हटवून पुन्हा महाविकास आघाडीतून उद्धव ठाकरे या ब्राह्मण व्यक्तीलाच मुख्यमंत्री करणार मग ही आपली भूमिका मराठ्यांच्या विरोधात दिसणार नाही का?दादा, विधानसभा निवडणुका झाल्यावर महाविकास आघाडीने पुन्हा म्हणू नये की, आमच्या हातात काही नाही. आरक्षण मर्यादा वाढवण्याचे अधिकार केंद्राच्या हाती आहे.अन्यथा दादा गरजवंत मराठ्यांची फसवणूक झाल्यावर या दुर्घटनेला कोण जबाबदार असणार? त्याची जबाबदार निश्चित करा, अन्यथा आपल्यासहित कोणत्याही मराठा नेतृत्वावर गरजवंत मराठा विश्वास ठेवणार नाही.