राजकारण म्हणजे थोडी धुसफूस असते, महाराष्ट्रासमोर कौटुंबिक वाद येऊ नये असं वाटतंय. त्यामुळे अनिकेत कदमने व्यवसाय सांभाळावा, त्याने राजकारणापासून लांब रहावं असा सल्ला त्यांचे चुलत बंधू आणि रामदास कदम यांचे पुत्र आमदार योगेश कदम यांनी दिला. विरोधकांनी आपल्या कुटुंबात भांडणं लावण्याचं काम सुरू केलं असल्याचा आरोपही त्यांनी केला. रामदास कदमांचे पुतणे अनिकेत कदम यांनी राजकारणात सक्रिय होण्याचे संकेत दिले असून त्यांनी योगेश कदम यांचे विरोधक ठाकरे गटाचे संजय कदम यांचा प्रचार करणार असल्याचं जाहीर केलंय.
अनिकेत कदम यांनी राजकारणापासून लांब रहावं
योगेश कदम म्हणाले की, आनिकेत कदम हा माझा चुलत भाऊ आहे. आमचं रक्ताच नात आहे. त्याने कोणाचा प्रचार करावा हा त्याचा वयक्तिक प्रश्न आहे.पण तो व्यावसायिक आहे त्याने व्यवसाय पहावा. त्याने राजकारणात येऊ नये असे मला वाटतं. तरीही त्याच्या भूमिकेचे स्वागत करतोय. त्याच्या राजकीय भूमिकेचा आमच्या नात्यावर फरक पडणार नाही.
विरोधकांनी कुटुंबात भांडण लावलं
आपल्या विरोधकांनी कुटुंबात भांडण लावल्याचा आरोप करत आमदार योगेश कदम म्हणाले की, आमच्या कुटुंबात वाद लावून विरोधकांनी स्वतःचा स्वार्थ साधण्याच्या प्रयत्न केला. विरोधकांनी तालुक्यामध्ये, सगळ्या वाड्यांमध्ये भांडण लावणं आणि एक गट आपल्या बाजूने घेण्याचं राजकारण केलं.अडीच तीन वर्षांपूर्वी आम्ही एकत्र येण्याचा प्रयत्न केला होता. निवडणूक येतात आणि जातात, रक्ताचं नातं हे कायम राहणार. त्यामुळे मी पुन्हा एकदा आमचे कुटुंब एकत्र यावे यासाठी प्रयत्न करेन.
राज्यात पुन्हा एकदा काका पुतण्या वाद
रामदास कदम यांचे पुतणे अनिकेत कदम यांनी आता राजकारणात सक्रिय होण्याचे संकेत दिले आहेत. आगामी निवडणुकीत दापोली मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संजय कदम यांना निवडून आणण्याचा निर्धार केला आहे मात्र त्यांच्या या निर्धारामुळे काका पुतण्यांमधील संघर्ष कोकणासोबतच संपूर्ण महाराष्ट्राला देखील पाहायला मिळणार आहे.