शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. चौथ्या दिवशी तुपकर यांचा रक्तदाब वाढला आहे. रक्तातील साखरेचं प्रमाणही लक्षणीय कमी झालं आहे. दरम्यान, आज राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी रविकांत तुपकर यांना फोन केला आहे. त्यांना उपोषण सोडून मुंबईला येण्याचं आवाहन कृषीमंत्री मुंडे यांनी केलं आहे.
तुपकर आपल्या आंदोलनावर ठाम
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी रविकांत तुपकर हे मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे अन्नत्याग आंदोलन करत आहेत. आज रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस असून रात्री तुपकर यांची स्थानिक उपविभागीय अधिकारी यांनी भेट घेतली होती. तसचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनीही तुपकर यांच्याशी फोन वरून बातचीत केली होती. आंदोलन थांबवून मुंबईला या ,आपण बैठकीत प्रश्न सोडवू असं आवाहन मुंडे यांनी केल्याची माहिती आहे. मात्र, तुपकर हे आपल्या आंदोलनावर ठाम आहेत.
रविकांत तुपकर यांची प्रकृती खालावली
दरम्यान चार दिवस अन्नाचा कणही न घेतलेल्या तुपकर यांची प्रकृती खालावली आहे. त्यांचा रक्तदाब वाढल्यानं रक्तातील साखरेचं प्रमाण लक्षणीय कमी झालं आहे. याबाबतची माहिती वैद्यकीय तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे.
सोयाबीन आणि कापसाला योग्य दर मिळावा
महाराष्ट्रात सोयाबीन आणि कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात केले जाते. परंतू, शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी योग्य भाव मिळत नाही. उत्पादन खर्चही निघत नाही आणि कापूस व सोयाबीनला उत्पादन खर्चाचा अर्धा भाव देखील मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याच कारणासाठी सोयाबीन आणि कापसाला योग्य दर मिळवण्यासाठी रविकांत तुपकर यांचे आंदोलन सुरु आहे. मागील काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे (Extreme heavy rain) शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीची शंभर टक्के भरपाई शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे. याशिवाय, फेब्रुवारीपर्यंत मिळायला हवा असलेला पीक विमा (Crop insurance) अजूनही शेतकऱ्यांना मिळालेला नाही. शंभर टक्के पीक विमा सर्व पात्र आणि अपात्र शेतकऱ्यांना मिळावा अशी मागणी तुपकर यांनी केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोयाबीन आणि कापूस दरासह पिक विम्याच्या मागणीसाठी रविकांत तुपकर हे लढा देत आहेत.