अखेर सिंधुदुर्ग दुर्घटनेतील शिल्पकार जयदीप आपटे याला अटक

0
276

शिल्पकार जयदीप आपटे याला अटक करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथील घराजवळून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. विशेष म्हणजे त्याच्या बायकोनेच पोलिसांना टीप दिली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला .या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता. पोलिसांनी त्याच्या विरुद्ध ‘लूक आऊट नोटीस’ही जारी केली होती. त्याच्या बेपत्ता असण्याने राजकीय वातावरण तापले होते. विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह राज्य आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. अपटे याला अटक झाल्यामुळे या प्रकरणातील अनेक घडामोडींची महिती पुढे येणार आहे.

शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट
मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याचे काम जयदीप आपटे याच्याकडे होते. त्याने किल्ल्यावर 30 फूटांहून अधिक उंचीचा पुतळा उभारला. ज्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. हा पुतळा उद्घाटन झाल्यापासून अवघ्या काही महिन्यांमध्येच कोसळला. त्यामुळे महाराष्ट्र आणि शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली. राज्य आणि केंद्र सरकारही हबकले होते. दरम्यान, प्रश्नांची सरबत्ती झाल्यावर राज्य सरकारने हा पुतळा नौदलाने उभारल्याचे सांगत जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या पुतळ्याची उभारणी करण्याची जबाबदारी कोणाची होती आणि आपटे याला कंत्राट कोणी आणि कोणाच्या संदर्भाने दिले, याबाबत अधिक चौकशी सुरु आहे. दरम्यान, हा पुतळा उभारणारा 39 वर्षी आपटे स्वत:च फरार होता. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले होते. त्यातच तो जेजे स्कूल ऑफ आर्टचा माजी विद्यार्थी असल्याचे सांगितले जाते. काही शिल्पकार आणि तज्त्रांनी आपटे याची पदवी बोगस असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे प्रकरणातील गुंतागुंत अधिकच वाढली होती.

पत्नीनेच दिली पोलिसांना माहिती
‘द टाइम्स ऑफ इंडिया’ (TOI) ने दिलेल्या वृत्तानुसार, आपटे हा मूळचा कल्याणचा असून तो आपल्या राहत्या घरी वर्कशॉप चालवत असे. कुटुंबीय आणि मित्रांनी आत्मसमर्पण करण्यास मन वळवल्यानंतर त्याला त्याच्या घराजवळ अटक करण्यात आली. अटक करण्यापूर्वी 10 दिवस आगोदर तो, मालवण येथे एका मित्रासोबत प्रवास करताना दिसला होता. पुतळा जिथे पुतळा उभारला गेला होता. पोलिसांच्या अहवालानुसार, प्रदीर्घ काळ फरार राहिल्यानंतर आपटे याने अखेरीस आपल्या पत्नीशी संपर्क साधून तिला घरी परतण्याच्या आपल्या योजनेबाबत माहिती दिली. पत्नीने ही माहिती पोलिसांना पुरवली. त्यावरुन कारवाई कारवाई करत, तो आपल्या कुटुंबाशी पुन्हा भेटण्यासाठी त्याच्या घराजवळ आला असता पोलिसांनी त्याला अटक केली.